ठाण्यात सफाई मार्शलचा ठेका अखेर रद्द, नागरीकांकडून सुरु होती लुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 05:16 PM2018-03-20T17:16:15+5:302018-03-20T17:16:15+5:30
सफाई मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंडाव्यतीरिक्त जास्तीची रक्कम वसुल करण्यात येत असल्याचा आरोप करीत सत्ताधारी शिवसेनेने तसेच विरोधकांनी संबधींत संस्थेचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव एक मताने मंजुर केला.
ठाणे - स्वच्छतेबाबत ठाणेकरांना शिस्त लागावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या स्वच्छता मार्शलच्या नेमणुकीबाबतच मंगळवारी लक्षवेधीच्या माध्यमातून सर्व पक्षीय नगरसेवकांनी हरकत घेतली. या सफाई मार्शलकडून ठाणेकरांची लुट सुरु असल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला. त्यामुळे हा ठराव रद्द करण्याची मागणी सदस्य अशोक वैती यांनी मांडली. त्यानुसार विरोधी पक्ष नेते यांनी ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला त्याला सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अनुमोदन दिले. नियमापेक्षा जास्त वसुली आणि कामात अनियमतिता असल्याने २०११ साली ज्या प्रमाणे स्वच्छता निरीक्षकांमार्फत दंड वसुली करण्यात येत होता, त्याच पद्धतीने नव्याने ठेका देऊन दंड वसुली करावी असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सभागृहात दिले आहेत. मात्र सभागृहाने केलेला हा ठराव प्रशासन मान्य करेल कि नाही याबाबत मात्र नगरसेवकांकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे.
सफाई मार्शलच्या अनियमित कारभाराबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी लक्षवेधी मांडली होती. तर ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी या लक्षवेधीला अनुमोदन दिले होते. यावेळी वैती यांनी मार्शल मार्फत कशा पध्दतीने लुट सुरु असल्याचे सांगत दंडाची पावती न फाडण्यासाठी जास्तीची रक्कम वसुल केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. तर देवराम भोईर यांनी देखील वैती यांचे समर्थन करीत हा ठेका रद्द करण्याची मागणी केली. तर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी सफाई मार्शल आणि ठाणे महापालिकेमध्ये झालेल्या करारामध्ये त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सफाई मार्शलला ठोक पगारावर नसल्याने जेवढे वसुली ते करतील त्यातच त्यांना आपला पगार काढावा लागणार असल्याने हि दंडाची रक्कम ते नागरिकांकडूनच वसूल करीत असल्याचे त्यांनी सांगतिले. त्यामुळे पालिकेने हा ठेका रद्द करुन नव्याने ठेका काढतांना या बाबीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील सफाई मार्शलच्या माध्यमातून कशाप्रकारे नागरिकांची लूट सुरु असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ठाण्यात एका मराठी सिनेमाचे शूटिंग सुरु असताना त्यांच्याकडूही ५० हजारांची मागणी एका पालिका अधिकाऱ्यांचे नाव न सांगता गंभीर आरोप केला.
प्रशासनाच्या वतीने खुलासा करताना उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी नगरसेवकांच्या आलेल्या तक्र ारी तथ्य असल्याची कबुली दिली असून कारभार सुधारण्यासाठी अशा सफाई मार्शलवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन सभागृहात दिले. मात्र प्रशासनाच्या या खुलाशावर सभागृहातील सदस्य समाधानी न झाल्याने अखेर मिलिंद पाटील यांनी हा ठेका रद्द करण्याचा ठराव सभागृहात मांडला. त्याला सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अनुमोदन दिले. सभागृहात ठराव मांडल्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा ठेका रद्द करून नव्याने ठेका देण्याचे आदेश यावेळी प्रशासनाला दिले. मात्र नव्याने ठेका देताना पूर्वीप्रमाणेचे स्वच्छता निरीक्षकांमार्फतच दंड वसुली करण्यात यावी तसेच वसुलीमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी पावतीचा सर्व रेकॉर्ड व्यविस्थत ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले .
उघड्यावर शौचास बसणे, कचरा टाकणे, रस्त्यात थुंकणे अशा प्रकारे शहर अस्वच्छ करणाºयांवर अंकुश बसावा यासाठी २४५ सफाई मार्शलची नियुक्ती करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ३० मार्शल ठाण्यात दाखल झाले असून त्यांना शहरातील महत्वाच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे. हे सफाई मार्शल शहर अस्वच्छ करु पाहणाºया नागरीकांकडून दंड वुसल करीत आहेत. १ डिसेंबर २०१७ रोजी ठाणे शहरात हे सफाई मार्शल दाखल झाले असून महिनाभर दंड वसूल न करता केवळ नागरिकांनामध्ये या मार्शलच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करण्यात आले. जनजागृती करण्यापूर्वी दंड आकाराने उचित नसल्याने सुरु वातीला जनजागृती करण्यात आली होती त्यानंतर आता थेट १ जानेवारी २०१८ पासून दंड वसुली करण्यास सुरु वात झाली आहे. ठाणे स्थानक परिसर , एसटी डेपो, चिंतामणी चौक, सॅटिस, अशा विविध ठिकाणी हे सफाई मार्शल तैनात करण्यात आलेआहेत .
महिला बचत गटांना ठेका देण्यावरून मतभेद -
हा ठेका रद्द करून महिला बचत गटांना ठेका देण्यात यावा अशी मागणी सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नगरसेविका परीशा सरनाईक यांनी केली. मात्र सफाई मार्शलचे काम महिलांना जमणार का? प्रत्यक्षात या गोष्टी शक्य नसल्याचे खडे बोल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी सभागृहात सुनावले. महापौरांच्या या निर्णयानंतर महिला बचत गटांना ठेका देण्याची मागणी मागे घ्यावी लागली .
आतापर्यंत ३२ लाखांची वसुली -
सफाई मार्शलच्या माध्यमातून आतापर्यंत ३२ लाख ६० हजार ९०० रु पयांची दंड वसुली करण्यात आली आहे. सफाई मार्शलच्या ठेकेदार आणि महापालिकेमध्ये झालेल्या कराराप्रमाणे एकूण वसुली पैकी५७ टक्के दंडाची वसुली ठेकेदाराने महापालिकेला द्यायची असून उर्वरीत रक्कम त्यांने मार्शलचे पगार देण्यासाठी खर्च करावे. त्यामुळे आतापर्यंत या सफाई मार्शलच्या माध्यमातून पालिकेला १८ लाख दंडाच्या स्वरूपात प्राप्त झाले असल्याची माहिती उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सभागृहात दिली आहे .
अशी आहे दंडाची रक्कम -
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे २०० रु पये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १००, सार्वजनिक ठिकाणी अंगोळ करणे १००, मुत्र विसजर्न १५०, प्राणी व पक्ष्यांना खाद्य भरवणे ५००, रस्त्याच्या कडेने शौचास बसने १५०, व्यावसायिक वाहनांना रस्त्याच्या कडेला धुणे १०००, रस्त्याच्या कडेला कपडे व भांडी धुणे १००, अस्वस्छ परिसर आणि आवार १० हजार, इमारतीच्या पिण्याच्या पाइपलाईन मधील सांडपाण्याच्या पाईपलाईन मधील गळती आणि त्यामुळे इतरांना होणारा त्रास आणि सुचना दिल्यानंतरही १० दिवसात दुरु स्ती न केल्यास १० हजार रु पयांचा दंड आकारण्यात येणार आहे.