सुमधुर हापूसकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:48 AM2019-04-22T02:48:27+5:302019-04-22T02:48:38+5:30
गतवर्षीच्या तुलनेत दर कमी; महागाईमुळे आंबा झाला चैनीची वस्तू, आवकही झाली कमी
ठाणे : उन्हाळा सुरू होताच फळांचा राजा बाजारात दाखल झाला खरा, पण आंब्याचे मार्केट घसरल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आंब्याची आवक कमी, दरही गतवर्षीच्या तुलनेत घसरलेले आणि ग्राहकांचा प्रतिसादही कमी अशी यंदाची परिस्थिती असल्याची खंत आंबाविक्रेत्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
उन्हाळी सुटी सुरू झाली की, आंब्याच्या खरेदीची लगबग सुरू होते. आंबे फस्त करण्यास लहानगे आणि तरुणांमध्ये स्पर्धाच सुरू होते. कोकणचा राजा म्हणून ओळख असलेल्या हापूस आंब्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात. मधुर रसाळ आंबा आबालवृद्धांपासून सर्वांनाचा हवाहवासा वाटतो. वाशीच्या घाऊक बाजारात आंब्याची पहिली पेटी आली की, त्याच्या महागड्या दराची ‘बातमी’ होते. गेल्या काही वर्षांपासून आंब्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. गेल्यावर्षी ओखी वादळ, अवकाळी पाऊस, मध्येच प्रचंड ऊन तर कधी थंड हवामान या वातावरणातील बिघाडीचा फटका आंब्याला बसला होता. परिणामी, आंब्याचे दर दुपटीपेक्षा अधिक होते. ७०० ते १५०० रुपये प्रतिडझन या दरांनी गतवर्षी आंब्यांची विक्री झाली होती. मे महिन्यात आंब्याची चांगलीच विक्री झाली होती. दिवसाला ५० ते ६० हजार रुपये कमावले होते. यंदा मात्र परिस्थिती उलट आहे. दिवसाला २० हजार रुपये मिळणे कठीण झाले असल्याचे आंब्याचे विक्रेते कुशल सुळे यांनी सांगितले. यंदा आंब्याचे दर घसरले आहेत. ३०० ते १२०० रुपयांपर्यंत आंब्याचे दर असले, तरी ग्राहक आंब्याची खरेदी करण्याकरिता खिशात हात घालत नाही, असे आंब्याचे विक्रेते सचिन मोरे यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आंबेविक्रीसाठी बाजारपेठेत आले असले, तरी खरेदीला मात्र एप्रिल महिन्यापासून सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात अगदी तुरळक खरेदी झाली. मे महिन्यात चांगली खरेदी होईल, अशी आशा उत्तरा मोरे यांनी व्यक्त केली. आंबा सुरुवातीला आला की, दोन महिने तरी खरेदी फारशी होत नसते.
दैनंदिन जेवणातील भाज्या ३० ते ३५ रुपये पाव किलो इतक्या महागल्या आहेत. याखेरीज, अन्य जिन्नस चढ्या दराने विकले जात आहेत. शाळा, कॉलेज, क्लासच्या फी वाढीची टांगती तलवार जूनमध्ये आहेच. सुटीत फिरायला जायचे तर रेल्वे, विमानाची तिकिटे कडाडली आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय हापूस आंब्यांची खरेदी करताना चारवेळा विचार करत असल्याचे विक्रेत्यांनी मान्य केले. रत्नागिरी हापूस ३०० ते ९०० रुपये प्रतिडझन, देवगड हापूस ४०० ते १००० रुपये प्रतिडझन, पायरी ५०० ते ८०० रुपये प्रतिडझन, वनराज आंबा १२०० रुपये प्रतिडझन, केसर आंबा ४०० ते ६०० रुपये प्रतिडझन या दराने आंब्यांची विक्री सुरू आहे.
मे महिन्यात वाढेल विक्री
उन्हाच्या तडाख्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आंब्याची खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर आहे. एप्रिल महिन्यात आंब्याकडे ग्राहक फारसे फिरले नाही. त्यामुळे अद्याप समाधानकारक खरेदी झाली नसल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले;मात्र मे महिन्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात आंब्याची खरेदी पुरेशी होईल, अशी आशा विक्रेत्यांना आहे.