ग्राहकदिनीही ग्राहक मंच उपेक्षितच!
By admin | Published: March 15, 2016 01:05 AM2016-03-15T01:05:21+5:302016-03-15T01:05:21+5:30
ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी सोडवण्यात ग्राहक मंचाला चांगलेच यश येत आहे. त्यामुळे ठाण्यातील ग्राहक मंचाचा व्याप दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र, तरीही अद्याप या मंचाला आपल्या
ठाणे : ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी सोडवण्यात ग्राहक मंचाला चांगलेच यश येत आहे. त्यामुळे ठाण्यातील ग्राहक मंचाचा व्याप दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र, तरीही अद्याप या मंचाला आपल्या रोजच्या कामकाजासाठी प्रशस्त सोडाच, पण पुरेशी जागाही उपलब्ध नाही. मंगळवारी जागतिक ग्राहक दिन साजरा होत असताना ग्राहकांना दिलासा देणाऱ्या ग्राहक मंचाची उपेक्षा थांबत नसल्याचे, त्याचीच परवड सुरू असल्याचे विदारक वास्तव उघड झाले आहे.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात कमी जागेत या मंचाचा कारभार सुरू आहे. त्यापेक्षा मोठी जागा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी या प्रयत्नांची दखल घेत तलावपाळी येथील दुय्यम निबंधकाचे कार्यालय देण्याची घोषणा केली. मात्र, आता ती जागाही या मंचाला कमी पडणार आहे.
मंचासाठी ही जागा नवीन असली तरी प्रत्यक्षात ही इमारत मात्र जुनी आहे. या दोन मजली इमारतीची डागडुजीदेखील मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. दुरुस्तीचा हा भाग सोडला तरी मंचाला आवश्यक असलेली सुमारे पाच हजार स्क्वेअर फुटांची ही जागा नाही. जेमतेम दीड ते दोन हजार स्क्वेअर फुटांची ही जागा आजच कमी पडते आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी इमारतीचे दोन्ही मजले ग्राहक मंचाला देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंचाला जागा मिळावी, यासाठी आरटीआय कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी मनावर घेऊन गडकरी रंगायतनच्या बाजूला असलेल्या दुय्यम निबंधकाचे दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय देऊ केले. मात्र, ही जागादेखील अपुरी आहे.
ग्राहक मंचाचा वाढता व्याप आणि सातत्याने वाढणाऱ्या तक्रारी पाहता मंचाला दोन्ही मजले देऊन आगामी ३० वर्षांची समस्या सोडवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर, जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या ग्राहक दिनी जर या संदर्भात काही सकारात्मक निर्णय झालाच तर मंच तसेच तक्रारदारांना देखील दिलासा मिळेल.