भाजीपाल्याच्या खरेदीसाठी ग्राहक येतात शेताच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 01:44 AM2021-03-07T01:44:14+5:302021-03-07T01:44:57+5:30

नेरळच्या शेतकऱ्याचा उपक्रम : रासायनिक खतांचा वापर नाही

Customers come to the farm to buy vegetables | भाजीपाल्याच्या खरेदीसाठी ग्राहक येतात शेताच्या बांधावर

भाजीपाल्याच्या खरेदीसाठी ग्राहक येतात शेताच्या बांधावर

googlenewsNext

कांता हाबळे

नेरळ  : कर्जत तालुक्यातील अनेक येथील शेतकऱ्यांनी शेतीकडे पुन्हा आपली पावले वळविली आहेत. त्यातून ग्राहकांना ताजी आणि रासायनिक खतांचा वापर न केलेली आणि जवळच्या शेतात पिकवलेली भाजी मिळत असल्याने ग्राहक आता थेट शेतावर पोहोचला आहे. दरम्यान, नेरळजवळील जिते गावातील शरद आणि शारदा जाधव या दाम्पत्याने आपल्या शेतात विविध प्रकारची भाजीपाला आणि भाजीची शेती केली आहे. 

कर्जत तालुक्यातील नेरळ-कशेळे या भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्यावर उल्हास नदीच्या तीरावर जिते गावातील शेतकरी यांची शेतजमीन आहे. त्या जमिनीवर तेथील जमीन मालक शरद मारुती जाधव यांनी  दुग्धव्यवसायामधून वेळ काढून शेतामध्ये भाजीपाला शेती करण्यास सुरुवात केली आहे. गेली दहा वर्षे ते त्या ठिकाणी फुल शेती करायचे. उल्हास नदीचे पाणी शेताजवळ असल्याने पंपाच्या साहाय्याने सहज शेतात येत असल्याने, जाधव दाम्पत्याने मागील तीन वर्षे भाजीपाला शेतीकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या घरी या आधी सुरू असलेल्या दुग्ध व्यवसायातून मिळणारे सेंद्रीय खत हे  भाजीपाला शेतीसाठी जैविक खत म्हणून वापरण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी आपल्या शेतातून पिकविलेला माल हा नेरळ अथवा कल्याणच्या बाजारात विक्रीसाठी न नेता, भीमाशंकर रस्त्यावर झोपडी बांधून विकण्यास सुरुवात झाली. त्यातून रस्त्याने जाणारे ग्राहक हे आपली वाहने थांबवून ताजा भाजीपाला घेऊ लागले. 

केवळ दोन माणसे हे सर्व शेतीचा डोलारा वाहत असल्याने, दररोज सर्व प्रकारचा भाजीपाला ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध ठेवता येत नाही. त्यामुळे शेवटी ग्राहकांना शरद जाधव हे आपल्या शेतात जाऊन भाजीपाला काढता येत असेल, तर काढा आणि वजन करून घेऊन जा, असे आवाहन करतात. शेतात आणि जमीन पाण्याने ओली असल्याने, चिखलात जाऊन भाजीपाला स्वतःच्या हाताने काढण्यासाठी अनेक ग्राहक उत्सुक असल्याचे शेतकरी शरद जाधव सांगतात. या वर्षी लॉकडाऊन काळात तर जाधव यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करायला लोकांची रीघ लागलेली असायची. रासायनिक खतांचा वापर केला जात नसल्याने भीमाशंकर रस्त्यावर शेतात पिकविलेला भाजीपाला अधिक लोकप्रिय झाला आहे.

nया वर्षी जाधव यांनी आपल्या एक एकर शेतात कढधान्य शेती केली आहे, तर एक एकर शेतात भेंडी, गवार, सिमला मिरची, वांगी, टोमॅटो, सितारा मिरची, लवंगी मिरची, कोबी, फ्लॉवर, गवार, दुधी, कारली, घोसाळे, शिराळे, मका, गाजर, बीट अशा प्रकारची भाजी पिकविलेली आहे. 

आम्ही पैसे कमवायचे आहेत, म्हणून शेती करीत नाही, तर शेतीच्या पिकातून आनंद मिळविण्यासाठी शेती करतो. त्यात भरपूर भाजीपाला आम्ही काढून ठेवत नाही, दररोज वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आम्ही काढून ठेवतो आणि त्यामुळे तो ग्राहक न आल्याने शिल्लकही राहत नाही. त्याचा फायदा आम्हाला आमच्या शेतातील माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आमच्यावर येत नाही.    - शरद जाधव, शेतकरी


 

Web Title: Customers come to the farm to buy vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.