ग्राहक देतात खऱ्या नोटा, पण बनावट नोटांची माळ देऊन गंडवतात ऑर्केस्ट्रा बार चालक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:45 AM2022-12-26T10:45:19+5:302022-12-26T10:45:35+5:30
ग्राहकांकडून असली नोटा घेऊन बारबालांच्या गळ्यात मात्र नकली नोटांचा हार बारवाले घालत असल्याचे उघडकीस आले आहे.
धीरज परब
मीरारोड - ऑर्केस्ट्रा बारच्या आड मीरा भाईंदरमध्ये सर्रास बारबाला तोकड्या कपड्यात अश्लील नाच व हावभाव करत आंबट शौकीन ग्राहकांना भुरळ घालत असतात. ग्राहक त्यांच्यावर कडक कोऱ्या नोटांची उधळण करत गळ्यात नोटांचा हार घालतात. परंतु काशीमीरा पोलिसांनी एका ऑर्केस्ट्रा बारवर टाकलेल्या धाडीत नोटांच्या हारातील नोटाच नकली असल्याचे आढळून आले आहे. ग्राहकांकडून असली नोटा घेऊन बारबालांच्या गळ्यात मात्र नकली नोटांचा हार बारवाले घालत असल्याचे उघडकीस आले आहे.
मीरा भाईंदरमध्ये ऑर्केस्ट्रा बारची संख्या मोठी आहे. ऑर्केस्ट्रा बार असल्याने नृत्यास मनाई आहे. तर गाण्यासाठी गायक म्हणून ८ जणांना ठेवण्याची परवानगी असली तरी गायिका म्हणून ठेवल्या जाणाऱ्या बारबाला प्रत्यक्षात तोकड्या तंग कपड्यात अश्लील नाच व हावभाव करताना दिसून येतात. पोलिसांकडूनही अशा प्रकारचे अनेक गुन्हेसुद्धा दाखल झाले आहेत.
काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पवार व पोलीस पथकाने मिळालेल्या माहिती नुसार २४ व २५ डिसेम्बर च्या मध्यरात्री दहिसर चेकनाका जवळ असलेल्या मंत्रा बारवर छापा टाकला. गायिका म्हणून असलेल्या ७ बारबालांनी तोकडे व पारदर्शक कपडे घालून अश्लील नाच व हावभाव चालवला होता. पोलिसांनी त्या ७ बारबालांसह १ वादक, ४ बार कर्मचारी, ५ ग्राहक व मालक कमला नारायण पुत्रण आणि चालक नितीन राज अशा २० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ग्राहकांना पोलिसांनी अटक केली. सदर बारचे मूळ नाव नित्यानंद भवन असे आहे.
बारमधील कारवाईत पोलिसांना नोटांचा हार मिळाला. आंबट शौकीन ग्राहक हे पसंतीच्या बारबालेच्या गळ्यात नोटांचा हार घालतात तसेच नोटा उडवत असतात. परंतु पोलिसांना मंत्रा बार मध्ये सापडलेला नोटांच्या हार मधील नोटा नकली असल्याचे आढळून आले.