८० टक्के कलमांना पालवी

By admin | Published: November 18, 2015 11:36 PM2015-11-18T23:36:06+5:302015-11-19T00:44:52+5:30

बागायतदार चिंतेत : आंबा हंगाम लांबण्याची भीती

Cut 80% of the pen | ८० टक्के कलमांना पालवी

८० टक्के कलमांना पालवी

Next

रत्नागिरी : आंबा पीक हे जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे असून, यावर्षी पाऊस कमी झाला आहे. असे असतानाही ८० टक्के आंबा कलमांना पालवी आली आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. एक लाख १७ हजार १९६ मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन सरासरी उपलब्ध होते. परंतु, फयान वादळानंतर आंबा उत्पादनावर परिणाम होत आहे. सन २०१२मध्ये थ्रीप्समुळे आंबा पिकाचे नुकसान झाले.
सन २०१४मध्ये अवेळीच्या पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक आंबा पिकाचे नुकसान झाले. मात्र, यावर्षी पावसाळा सरासरीपेक्षा निम्मा झाला आहे. तरीदेखील मोठ्या प्रमाणावर कलमांना पालवी फुटली आहे. पालवी जून होईपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे किरकोळ २० टक्के झाडांनाच मोहोर आला आहे.
पहाटे २४ अंश सेल्सियस, तर दिवसा ३४ अंश सेल्सियस इतके तापमान आहे. शिवाय मतलई वारे वाहू लागले आहेत. परंतु, असे हवामान आॅक्टोबरमध्ये असणे आवश्यक होते. थंडी ऊशीरा सुरू झाल्याने मोहोर प्रक्रिया हंगाम लांबणार हे निश्चित आहे. मध्येच ढगाळ वातावरण असल्यामुळे संबंधित हवामान हे तुडतुडावाढीस पोषक आहे. त्यामुळे किरकोळ मोहोराबरोबरच पालवीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोहोराचे प्रमाण चांगले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात कल्टार वापरलेल्या व न वापरलेल्या दोन्ही झाडांना पालवी आली आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण ४० हजार लीटर कल्टारचा वापर करण्यात आला.
लवकर उत्पादन मिळावे, यासाठी कल्टारचा वापर करण्यात येतो. ६००० रुपये लीटरप्रमाणे शेतकऱ्यांनी कल्टारला पैसे मोजूनसुध्दा कलमांना आलेल्या पालवीमुळे शेतकरीवर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे. लवकर उत्पादन मिळावे, यासाठी दरवर्षी शेतकरी हजारो रूपयांचे कल्टार वापरतात. परंतु, त्या तुलनेत शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत नसल्यामुळे हा खर्च वाया जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर पालवी जून होण्यासाठी काही प्रतिबंधात्मक औषधांचा वापर सुरू केला आहे. मोहोर आल्यापासून फळे काढेपर्यंत टप्प्याटप्प्याने विविध कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस कीटकनाशक औषधांचे लाखो रुपयांचे बिल भरावे लागते. त्या तुलनेत उत्पादन न मिळाल्यास शेतकऱ्यांचा खर्च वाया जातो.
गतवर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ती न मिळाल्यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा पिकावर परिणाम होत आहे. त्यामुळे यावर्षी मार्च महिन्यात आंब्याचे उत्पादन मिळण्याऐवजी त्यासाठी आता आंबा उत्पादन घेण्यासाठी तब्बल एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
चिंता संपेना : वातावरणाची साथ मिळेना...
रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्याला निसर्गाची आणि वातावरणाची साथच मिळेनासी झाली आहे. पोषक वातावरण नसल्याने हापूसचा दर्जा आणि हंगामही विस्कळीत झाला आहे. कलमांना मोहोर येण्याच्या काळातच पाऊस सुरु होतो आणि त्यानंतर हा पाऊस अधूनमधून पडतच राहतो. अशा विचित्र वातावरणामुळे गेली चार ते पाच वर्षे हापूस आंब्याचे हातातोंडाशी आलेले उत्पादनही तोट्यात जात आहे.

Web Title: Cut 80% of the pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.