कापुरबावडी ते ढोकाळीकडे जाणारा कट अखेर खुला; शिंदे सेना, भाजपमध्ये श्रेयासाठी चढाओढ
By अजित मांडके | Published: April 24, 2024 05:48 PM2024-04-24T17:48:13+5:302024-04-24T17:48:31+5:30
आम्ही वचनपूर्ती केल्याचा गवगवा दोनही पक्षांकडून सुरु झाला आहे
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लोकसभा निवडणुकीच्या धामधुम सुरु असतांनाच कापुरबावडीपासून ढोकाळी, कोलशेतकडे जाणारा वाहतुकीचा बंद असलेला मार्ग अखेर बुधवारी दुपारी जेसीबीच्या सहाय्याने तोडून खुला करण्यात आला. त्यामुळे आता ढोकाळीकडे जाण्यासाठी मारावा लागणारा वळसा कमी होऊन येथील वाहतुक कोंडी देखील सुटणार आहे. परंतु याचे श्रेय आता शिंदे सेना आणि भाजपकडून घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. वास्तविक पाहता, वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी येथील पुलाखालील हा मार्ग बंद करण्यात आला होता. परंतु वाहतुक कोंडी काही फुटली नाही, मात्र आता आम्ही वचनपुर्ती केल्याचा गवगवा मात्र या दोनही पक्षांकडून सुरु झाला आहे.
दीड वर्षापूर्वी ठाणे शहरात होणाºया वाहतुक कोंडीवर उपाय करण्यासाठी सुमीत बाबाने मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार शहरातील अनेक भागात डिव्हाडर टाकण्यात आले. कुठे मार्ग बंद करण्यात आला, तर कुठे लोखंडी रॉड टाकण्यात आले. परंतु त्यातील काहीच पर्याय हे वाहतुक कोंडी सोडवू शकले. मात्र काही पर्याय हे वाहतुक कोंडीत आणखी भर घालणारेच ठरल्याचे अधोरेखीत झाले होते. त्यातील वाहतुक कोंडी सोडविण्याचा पर्याय कापुरबावडी नाक्यापासून पुढे गेल्यावर पुलाखालून ढोकाळीकडे जाणाºया मार्गावर करण्यात आला होता. येथील पुलाखालील मार्ग ढोकाळीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वाहनांना थेट माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीवरुन हायलॅन्ड मार्गे जावे लागत होते. परंतु त्यामुळे ढोकाळी नाक्यावर वाहनांची संख्या वाढून त्याठिकाणी सांयकाळ पासून वाहतुक कोंडीत आणखी भर पडल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही पुलाखालील मार्ग काही सुरु केला जात नव्हता.
मध्यंतरी भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर आणि शिंदे सेनेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी हा कट खुला करण्यासाठी प्रयत्न केला होता. असा दावा आता दोघांकडूनही केला गेला आहे. दरम्यान बुधवारी दुपारी १२ वाजता जेसीबीच्या सहाय्याने येथील कट खुला करण्यात आला. यावेळी शिंदे सेनेच्या पदाधिकारी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी शक्तीप्रदर्शन करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न दोघांकडूनही करण्यात आला.
मागील एक वर्षापासून आम्ही येथील कट खुला व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते वाहतुक पोलिसांकडे पाठपुरावा करीत होतो. त्यानंतर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा कट खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा कट खुला करण्यात आला आहे. परंतु या कामाचे श्रेय भाजपच्या आमदारांनी घेऊ नये, मागील १० वर्षात त्यांनी काय काम केले हे आधी सांगावे मग श्रेय घ्यावे.
-संजय भोईर, माजी स्थायी समिती, सभापती, ठामपा - शिंदे सेना
आम्ही हा कट खुला करण्यासाठी जे काही केले, त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. त्यामुळे, आम्ही काय केले हे कुणी सांगू नये. हा कुट खुला करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. येथील सोसायटीधारकांनी देखील आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु दप्तर दिरंगाईमुळे लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. अखेर हा कट खुला झाला असल्याने पाठपुराव्याला यश आले असेच म्हणावे लागणार आहे.
-संजय केळकर, आमदार, भाजप, ठाणे शहर