ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:49 PM2024-11-19T12:49:37+5:302024-11-19T12:52:25+5:30
एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
बदलापूर : बदलापुरात आपसात जे काही वाद असतील ते विसरून जा. भाऊबंदकीची ही वेळ नाही. महायुतीच्या उमेदवाराला ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते मिळतील त्याचे तिकीट कापले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिला.
महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत शिंदे बोलत होते. राज्यात भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाची युती असली तरी बदलापुरात शिंदेसेनेचा एक गट अद्याप प्रचारात उतरलेला नाही. आपल्या विरोधात काम करीत असल्याची तक्रार कथोरे यांनी शिंदे यांच्याकडे केली. निवडणुकीनंतर एकत्र बसून सगळे वाद सोडविले जातील, मात्र निवडणुकीत एकदिलाने काम करा, अशी सूचना शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केली.
चुकीला माफी नाही
माता-भगिनींकडे जो वाकड्या नजरेने पाहील, अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल, चुकीला माफी नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील त्या नराधमाला पोलिसांनी गोळी घातली हे चुकीचे केले का ? असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थितांना विचारला.