ऑनलाइन अर्जात सायबर कॅफेची दुकानदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:53 AM2020-07-29T00:53:46+5:302020-07-29T00:53:57+5:30
पोलीस हैराण : राजकीय नेत्यांचे वशिले, चिरीमिरी कामी येत असल्याची चर्चा
सदानंद नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : गावी जाण्यासाठी नागरिकांना ई-पास घेणे गरजेचे असून नियमानुसार आॅनलाइन अर्ज भरूनही ई-पास मिळत नसल्याने नागरिकांत असंतोष आहे. दुसरीकडे, ई-पास मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे व खोटीनाटी कारणे अर्जात दाखविली जात असल्याने पोलीस हैराण झाले आहेत.
ई-पास देणारी साखळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर, जिल्हा व राज्यबंदी घालण्यात आली आहे. मात्र अशा वेळी गावी जाण्यासाठी अनेक नागरिक इच्छुक आहेत. विनाकारण गावी जाणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने ई-पास सुरू केले. ई-पास मिळविण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या वेबसाइटवर आॅनलाइन अर्ज करावे लागतात.
ई-पास मिळविण्यासाठी केलेले अर्ज पोलीस फेटाळतात. मात्र राजकीय नेत्यांची शिफारस असल्यास त्वरित ई-पास दिला जातो, असा नागरिकांचा अनुभव आहे. नागरिक ज्या सायबर कॅफेमधून अर्ज करतात, तो सायबर कॅफे चालक ई-पास कसे मिळतात, याचे विविध मार्ग दाखवतो. चिरीमिरी दिल्यावर ई-पास मिळतो, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र बहुतांश अर्जात खोटी माहिती, बनावट कागदपत्रे दिलेली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आपली पोलीस दरबारी ओळख असल्याचे सांगून ई-पास काढून देतो, असा धंदा जोरात सुरू आहे. पोलिसांनी छडा लावून ई-पास देण्यात पारदर्शकता आणण्याची मागणी होत आहे.
ई-पाससाठी कराव्या लागणाºया अर्जासोबत प्रतिबंधित क्षेत्रात राहत नाही, असे महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांचे पत्र, आधारकार्ड, ज्या वाहनाने प्रवास करणार आहात त्याचा नंबर, गावी जाण्याचे कारण आदी कागदपत्रे जोडावी लागतात. नागरिक बहुतांश अर्ज सायबर कॅफेतून भरतात. मात्र बहुतांश अर्जावर कारण पटत नाही, असा शेरा मारून परवानगी नाकारली जाते.