Cyclone Nisarga: चक्रीवादळाने मीरा-भाईंदरच्या मच्छीमारांचं नुकसान; दिशा बदलल्यानं धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 08:37 PM2020-06-03T20:37:59+5:302020-06-03T20:39:20+5:30

Cyclone Nisarga: वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.

Cyclone damages Mira-Bhayander fishermen; The change of direction averted the danger | Cyclone Nisarga: चक्रीवादळाने मीरा-भाईंदरच्या मच्छीमारांचं नुकसान; दिशा बदलल्यानं धोका टळला

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने मीरा-भाईंदरच्या मच्छीमारांचं नुकसान; दिशा बदलल्यानं धोका टळला

googlenewsNext

मीरा रोडः निसर्ग या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक या समुद्र किना-यावरील गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु वादळाच्या शक्यतेने बोटी व त्यातील साहित्य सुखरुप ठेवण्यासाठी मच्छीमारांची मोठी तारांबळ उडाली. सुकवत ठेवलेली मासळी भिजून नुकसान  झाले. प्रशासनाने खबरदारी म्हणून काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.

चक्रीवादळ येण्याच्या शक्यतेने समुद्र किनारी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले होते. या शिवाय अग्निशमन दल, पोलीस व तटरक्षक दलसुद्धा सज्ज होते. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, मंडळ अधिकारी दिपक अनारे, तलाठी तर उपअधीक्षक शशिकांत भोसले, सहय्यक निरीक्षक सतीश निकमसह पोलीस व एनडीआरएफच्या जवानांनी कोळीवाड्यांमध्ये फिरून परिस्थतीचा आढावा घेतला. आयुक्त चंद्रकांत डांगे देखील पालिका अधिकारायांसह दुपारनंतर उत्तनला पोहोचले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून सातत्याने आढावा घेतला जात होता तसेच आवश्यक सूचना ते करत होते.  

महसूल, पोलीस व पालिका प्रशासाने मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेवक शर्मिला गंडोली, हेलन गोविंद, एलायस बांडय़ा तसेच चर्चच्या धर्मगुरुंसोबत फिरून किना-यावर राहणा-या मच्छीमारांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. संत जोसेफ शाळा व वेलंकनी चर्च येथे लोकांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी मच्छीमारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी भुतोडी बंदर भागातील समुद्रालगतची काही घरं रिकामी करायला घेतली होती. त्यांना नजीकच्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पालिकेने 5 बस लोकांना नेण्यासाठी तैनात केल्या होत्या. शिवाय रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते.

अनेक मच्छीमारांच्या बोटी समुद्रातच होत्या. वारा - पाऊस त्यातच वादळाचा धोका या मुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किना-यावर घेण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. क्रेनच्या सहाय्याने तसेच गरज असेल तिकडे मच्छीमारांनी दोरखंडाने बोटी ओढून किना-यास आणल्या. बोटींमधील जाळी व अन्य सामान काढण्यासह बोटींची बाहेरुन सफाई करण्याचे काम लगबगीने केले जात होते. त्सुनामी वेळी देखील उत्तन समुद्र किना-यास फटका बसलेला नसल्याने चक्रीवादळाबाबत देखील अनेक मच्छीमार फारसे गंभीर दिसत  नव्हते. परंतु अनेक घरांमध्ये चक्रीवादळाचे संकट टळू दे अशी प्रार्थना केली गेली. वादळी वा-यामुळे पत्रे उडून कोणी जखमी वा जीवितहानी होऊ याची भीती होती. सुदैवाने तशी घटना घडली नाही.

दरम्यान, वादळी वारा व पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या 10 घडना घडल्या. सृष्टी, पेणकरपाडा, उत्तन, काशीगाव, आंबेडकर नगर, नवघरचे रवीकिरण आदी भागात झाडं पडली. नवघरच्या साईचरण इमारत भागात झाड पडल्याने एका वाहनाचे नुकसान झाले. तर भाईंदर पोलीस ठाण्या समोर रस्त्यावर उभारलेली तपासणी शेड खालुन जाणाराया वाहनांवर पडली. परंतु यात नुकसान असे झाले नाही असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले. 
 

Web Title: Cyclone damages Mira-Bhayander fishermen; The change of direction averted the danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.