कयार चक्रीवादळाचा फटका, माशांच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 10:30 AM2019-11-16T10:30:39+5:302019-11-16T10:30:58+5:30
ठाणे, मुंबई, तसेच पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्टपासून मासेमारीचा हंगामा सुरू होतो
विशाल हळदे
ठाणे - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळामुळे सतर्कता म्हणून कुलाबा, पालघर, डहाणू, वसई यांसारख्या भागांमध्ये समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचा थेट फटका मासेमारी उत्पादनाला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात माशांची आवक घटल्यामुळे किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. माशांच्या पुरवठ्यात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
ठाणे, मुंबई, तसेच पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्टपासून मासेमारीचा हंगामा सुरू होतो आणि ऑक्टोबरनंतर चांगल्या प्रकारे मासे मिळायला सुरुवात होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मासे उत्पादनावर झालेला पाहायला मिळत आहे. ठाणे तसेच आसपासच्या शहरात माशांची आवक ही कुलाबा आणि भाऊच्या धक्क्याहून होत असते. गेल्या काही दिवसांपासून या पुरवठय़ात घट झाल्याने माशांच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. हिवाळ्याच्या दिवसात माशांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. सद्य:स्थितीत बाजारात मागणीप्रमाणे माशांची आवक होत नसल्याने त्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे मासळी विक्रेत्यांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यात १५० रुपये किलो या दराने मिळणारे बोंबिल सद्य:स्थितीला २०० रुपये किलोने मिळत आहे. तर, ४०० रुपये किलोने मिळणारी कोळंबी सद्य:स्थितीला ५०० रुपये किलोने मिळत आहेत. पापलेट आकारानुसार ६०० ते १२०० रुपये किलोने मिळत होते. आता, ते ८०० ते १५०० रुपये किलोने मिळत आहेत, आणि ५५० रुपये किलोने मिळणारी सुरमई सद्य:स्थितीला ८०० रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे माशांच्या किमतीत प्रतिकिलोमागे १०० ते ३०० रुपयाने वाढ झाल्याने मासे खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. गेल्या काही काळात जिताडा माशालाही खवय्यांकडून मोठी मागणी असते. उत्तम प्रतीच्या जिताडय़ाचे दरही किलोमागे एक हजार ते १२०० रुपयांपर्यत पोहोचले आहेत.