डी कंपनीच्या गांगरला बोरीवलीतून अटक, शस्त्र खरेदीसाठी मदत, महिन्याला १0-१५ लाखांचा हवाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 02:49 AM2017-09-29T02:49:00+5:302017-09-29T02:49:12+5:30
देशाच्या आर्थिक राजधानीवर पकड ठेवणा-या डी कंपनीने अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला मोर्चा मुंबईबाहेरही वळवला आहे.
ठाणे : देशाच्या आर्थिक राजधानीवर पकड ठेवणा-या डी कंपनीने अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला मोर्चा मुंबईबाहेरही वळवला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार खंडणी वसुलीचे जाळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह पुणे, नाशिक, दिल्ली तसेच लखनऊपर्यंत पसरल्याचे समजते. तर या प्रकरणात बोरीवलीतून मटकाकिंग पंकज गांगरला गुरुवारी अटक करण्यात आली.
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरसह तिघांना १९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. छोटा शकील या टोळीचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही आरोपी केले. पुणे, नाशिक, दिल्ली आणि लखनऊ या शहरांमधूनही डी कंपनीने खंडणी वसुली केल्याचा संशय पोलिसांना आहे.
व्यापाºयांकडून खंडणी वसूल करण्यासाठी या डी कंपनीकडून परराज्यांतील गुंडांना पोसले जाते. खंडणीसाठी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या असून, त्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
लकडावाला ताब्यात
इक्बाल कासकरला फंडिंग करत असल्याच्या संशयातून बुधवारी रात्री ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने नागपाड्यातून अस्लम हाजी लकडावालाला ताब्यात घेतले. लकडावाला हा कंत्राटदार आहे.
जे.जे. मार्ग परिसरात सुरू असलेल्या एसबीयूटीकडून क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत काही इमारतींचे काम त्याने हाती घेतल्याचे समजते.
गांगर पुरवायचा पैसा
इक्बाल कासकर आणि छोटा शकील टोळीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गांगर गुंतलेला असल्याचे तपासामध्ये आढळले आहे. न्यायालयाने त्याला ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बोरीवलीचा मटकाकिंग पंकज गांगर हा छोटा शकीलचा अर्थपुरवठादार असून, तो महिन्याकाठी १0 ते १५ लाख रुपयांचा हवाला करायचा, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. याशिवाय तो शस्त्र खरेदीसाठीही टोळीला फायनान्स करायचा, असे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले.