दबंगगिरीकडून गांधीगिरीकडे
By Admin | Published: May 16, 2017 12:14 AM2017-05-16T00:14:03+5:302017-05-16T00:14:03+5:30
महापालिकेच्या वतीने फेरीवाले, रिक्षावाले यांच्या विरोधात गेले सात दिवस सुरू असलेल्या कारवाईबाबत सोशल मीडियात विरोधी सूरही उमटू लागल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिकेच्या वतीने फेरीवाले, रिक्षावाले यांच्या विरोधात गेले सात दिवस सुरू असलेल्या कारवाईबाबत सोशल मीडियात विरोधी सूरही उमटू लागल्याने सोमवारी कारवाईकरिता सायंकाळी रस्त्यावर उतरलेले महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चक्क नागरिकांशी संवाद साधत आपण करत असलेली कारवाई योग्य की अयोग्य, असा सवाल केला.
सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ठाणे स्टेशन ते जांभळीनाका बाजारपेठ असा पाहणी दौरा आयुक्तांनी केला. या वेळी नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यांची पथकेही त्यांच्या दिमतीला होती. या वेळी रस्त्यावर एकही फेरीवाला आढळून आला नाही. नियमाचे उल्लंघन करून रिक्षा पार्क करणाऱ्या रिक्षाचालकांना आणि वाहनचालकांना आयुक्तांनी आपली वाहने हलवण्याची तसेच शिस्तीत उभी करण्याची विनंती केली. आयुक्तांच्या या विनंतीला वाहनचालकांनीदेखील तितक्याच विनम्रतेने प्रतिसाद दिला. यापूर्वी जयस्वाल यांनी रिक्षावाले, वाहनचालक यांना स्वत: चौदावे रत्न दाखवले होते. त्याबद्दल फेसबुक, टिष्ट्वटर व व्हॉट्सअॅपवर विरोधी सूर उमटल्याने आयुक्तांनी आपल्या आक्रमकतेला मुरड घातल्याचे बोलले जाते. याच विरोधातील चर्चेची दखल घेत आयुक्तांनी काही नागरिकांशी संवाद साधून त्यांना आपल्या कारवाईबद्दल काय वाटते, याचा कानोसा घेतला आणि आपली भूमिका सांगितली.