उल्हासनगरमध्ये भूमाफियांची दबंगगिरी; गुन्हा दाखल, पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 01:59 AM2021-03-22T01:59:07+5:302021-03-22T01:59:25+5:30
उल्हासनगर कॅम्प नं ३ शांतीनगर परिसरात सुरू असलेल्या एका बेकायदा बांधकामाला प्रभाग समिती क्रं १ च्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून कामबंद ठेवण्याचे बजावले होते
उल्हासनगर : शांतीनगर येथे सुरू असलेले बेकायदा बांधकाम थांबविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना भूमाफियांनी एका खोलीत कोंडून मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी ब्रह्माणे यांच्यासह अन्य जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं ३ शांतीनगर परिसरात सुरू असलेल्या एका बेकायदा बांधकामाला प्रभाग समिती क्रं १ च्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून कामबंद ठेवण्याचे बजावले होते. मात्र महापालिकेच्या नोटिसला केराची टोपली दाखवून बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. याची माहिती समितीमधील बीट मुकादम प्रकाश सकट व आत्माराम सोनावणे यांना मिळल्यावर, त्यांनी शनिवारी सुटी असताना या बांधकामाच्या ठिकाणी शनिवारी सकाळी ११.३० वाजता धाव घेतली. त्यांनी बांधकाम थांबविण्याची विनंती केल्यावर, बांधकाम सुरूच ठेवून दोघांना एका खोलीत नेण्यात आले. तसेच त्यांना मारहाण केली. झालेल्या प्रकारची माहिती वरिष्ठांना दिल्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून ब्रह्माणे यांच्यासह सहापेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच प्रभाग समिती क्र. १ मधील बेकायदा बांधकामावर पाडकाम कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला असून, सर्रासपणे आरसीसी व टी ग्रेटरची बांधकामे उभी राहत आहेत. बेकायदा बांधकाम प्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिल्यावर, राणा डम्पिंग ग्राउंडच्या पायथ्याशी उभे राहत असलेल्या बेकायदा चाळीच्या बांधकामावर सहायक आयुक्त अनिल खतुरानी यांच्या पथकाने पाडकाम कारवाई केली. मात्र शहरातील इतर शेकडो बांधकामावर कारवाई कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्तांनी एक विशेष पथक स्थापन करून बेकायदा बांधकामावर धडक कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.