दरोडे, जबरी चोऱ्या करणारी टोळी भिवंडीतून गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:12 PM2018-04-28T23:12:54+5:302018-04-28T23:12:54+5:30
सोने-चांदीची किंवा रोख रकमेची वाहतूक करणा-यांवर पाळत ठेवून त्यांना लुटणाºया टोळीला ठाणे पोलिसांनी जेरबंद केले
ठाणे : सोने-चांदीची किंवा रोख रकमेची वाहतूक करणा-यांवर पाळत ठेवून त्यांना लुटणाºया टोळीला ठाणे पोलिसांनी जेरबंद केले. कोल्हापूर आणि भिवंडीमधील सात आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांनी २५ गुन्ह्यांची कबुली दिली.
वेगवेगळ्या आस्थापनांच्या रोख रकमेची वाहतूक कुणाकडून आणि कुठून केली जाते, याची तपशीलवार माहिती काढून त्यांना लुटण्याचे गुन्हे भिवंडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी भागात घडले आहेत. अशा पद्धतीचे गुन्हे करणारे काही आरोपी भिवंडीतील ब्रह्मानंदनगरात वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या भिवंडी युनिटचे पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. पाटील यांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी विजय नायर या आरोपीस ताब्यात घेतले. मोटारसायकलस्वारांना मारहाण करून त्यांना लुटल्याच्या गुन्ह्यांची कबुली त्याने दिली.
भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमावर चॉपरने हल्ला करून त्याने सात लाख ४० हजार रुपये लुटले होते. त्याच्या टोळीत आठ आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी इचलकरंजी येथून तीन तर भिवंडी येथून चार आरोपींना अटक केली. या टोळीतील एका सदस्याचा दरम्यानच्या काळात मृत्यू झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक मकरंद रानडे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपींनी भिवंडी, इचलकरंजी येथे सात दरोडे, तीन जबरी चोºया आणि एक मारहाणीचा गुन्हा केला आहे. आरोपींकडून जुन्या एक हजार रुपयांच्या ३७ नोटा, २८ हजार रुपयांच्या नवीन नोटा आणि लॅपटॉप असा एक लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अन्य कारवाईत पोलिसांनी एका सराईत सोनसाखळीचोरास अटक करून १४ गुन्हे उघडकीस आणले. हुज्जुअली यासरअली जाफरी हे आरोपीचे नाव असून तो भिवंडीतील इराणीपाड्यात राहतो.
त्याच्याकडून सहा लाख ९० हजार ४४० रुपयांचे दागिने हस्तगत केले. २५ गुन्ह्यांची उकल करून आठ लाख १५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.