दादर-पंढरपूर, साईनगर पॅसेंजर झाल्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:47+5:302021-03-14T04:35:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मध्य रेल्वेने दादर-पंढरपूर आणि दादर-साईनगर शिर्डी पॅसेंजर गाड्या शुक्रवारपासून सुरू केल्या आहेत. राज्यांतर्गत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मध्य रेल्वेने दादर-पंढरपूर आणि दादर-साईनगर शिर्डी पॅसेंजर गाड्या शुक्रवारपासून सुरू केल्या आहेत. राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व सामान्य जनतेला परवडणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने लोकांचे प्रचंड हाल होत होते. मात्र, आता या गाड्या सुरू होत असल्याने प्रवासी महासंघाने आनंद व्यक्त केला.
रेल्वेच्या पॅसेंजर व अन्य लांब-पल्ल्यांच्या मेल एक्स्प्रेस गाड्या बंद असल्याने रस्ते वाहतूक वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात
होत आहेत. ही परिस्थिती पाहता राज्यांतर्गत पॅसेंजर गाड्या सुरू करा, अशी आग्रही मागणी महासंघाने मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली होती. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. रेल्वे प्रशासनानेही आता पॅसेंजर गाड्या सुरू केल्या आहेत.
पंढरपूर पॅसेंजर सोमवार, शुक्रवार व रविवार अशी आठवड्यात तीन दिवस, तर शिर्डी साईनगर पॅसेंजर मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार अशी चार दिवस चालवली जाणार आहे. दोन्ही गाड्या दादर स्थानकातून सुटतील. शिर्डी साईनगर पॅसेंजर रात्री ११.४५ वाजता व पंढरपूर रेल्वे गाडी रात्री ११.५५ वाजता सुटेल. या गाड्या कोरोना काळातील आवश्यक त्या खबरदारी व निर्बंधांचे पालन करून चालवल्या जातील व प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पॅसेंजर सुरू झाल्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रवासी महासंघ याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभारी असल्याचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी सांगितले.
तसेच संघटनेच्या मागणीनुसार सावंतवाडी, रत्नागिरी, पुणे-पनवेल या व अन्य सर्व राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या मेल एक्स्प्रेस लवकर सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे.
---------