मीरा-भाईंदरमध्ये एकाच क्रमांकावर धावत होत्या दाेन रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:48+5:302021-02-23T04:59:48+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये एकाच क्रमांकावर दाेन रुग्णवाहिका चालवून रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार काँग्रेस आघाडीतील नगरसेवक ...
मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये एकाच क्रमांकावर दाेन रुग्णवाहिका चालवून रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार काँग्रेस आघाडीतील नगरसेवक राजीव मेहरा यांनी उघड केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मीरा रोडच्या शीतलनगर व साईबाबानगर भागात मेडीकेअर नावाने उभ्या राहणाऱ्या दोन रुग्णवाहिकांचे क्रमांक सारखेच असल्याचा प्रकार नगरसेवक राजीव मेहरा यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याप्रकरणी माहिती घेण्यास सुरुवात केली. वाहन ॲपवर या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे फिटनेस प्रमाणपत्रही २७ डिसेंबर २०१३ पर्यंतच असल्याचे आढळून आले.
मेहरा यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना लेखी तक्रार करून डॉ. अशोक चोमल व संबंधितांवर कारवाईची मागणी केली. याशिवाय मेहरा यांनी अन्य तीन रुग्णवाहिकांचे क्रमांकही ॲपवर आरसी बुकच दाखवत नव्हते. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर मेडिकेअर नावाच्या (एमएच ०४ एफजे ३४८८) या एकाच क्रमांकाच्या दाेन रुग्णवाहिकांच्या तपासासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी उपनिरीक्षक एम. जी. पाटील यांच्यासह मनीष शिंदे आदी पोलिसांचे एक पथक बनविले. या पथकाने या दोन्ही रुग्णवाहिका जप्त केल्या आहेत.
बनावट परवाना, कागदपत्रे
मीरा रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी रुग्णवाहिकामालक चोमल आदींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका रुग्णवाहिकेची कागदपत्रे बनावट असल्याची तसेच एका चालकाकडे बनावट वाहन परवाना आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.