डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये १३ ऐवजी १७ डिसेंबरला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:24 AM2017-12-09T05:24:11+5:302017-12-09T05:24:40+5:30

पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 Dahanu, Jawhar and Taloda will vote on December 17 instead of 13 | डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये १३ ऐवजी १७ डिसेंबरला मतदान

डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये १३ ऐवजी १७ डिसेंबरला मतदान

Next

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या ठिकाणी १३ डिसेंबरऐवजी १७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.
नगर परिषद निवडणुकांमधील उमेदवारी अर्जाबाबत न्यायालयाचा निकाल आणि त्या अनुषंगाने संबंधित अधिनियमातील तरतुदी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. नवीन वेळापत्रकानुसार डहाणू, जव्हार आणि तळोदा येथे १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. तर, मतमोजणी दुसºया दिवशी १८ डिसेंबरला होईल. यासोबतच खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.६-अ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील १३ डिसेंबर ऐवजी १७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले.
इगतपुरी, त्र्यंबक (नाशिक) आणि जत (सांगली) येथील नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मात्र आधी घोषित केल्याप्रमाने दहा डिसेंबरला मतदान होईल. हुपरी (कोल्हापूर), नंदुरबार, नवापूर (नंदुरबार), किनवट (नांदेड), चिखलदरा (अमरावती), पांढरकवडा (यवतमाळ), वाडा (पालघर), शिंदखेडा (धुळे), फुलंब्री (औरंगाबाद) आणि सालेकसा (गोंदिया) या नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी १३ डिसेंबर रोजीच मतदान होईल, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले.
इगतपुरी, त्र्यंबक आणि जत येथे उद्या मतदान
इगतपुरी त्र्यंबक आणि जत नगरपरिषदेसाठी सदस्यपदांसोबतच थेट अध्यक्षपदासाठीदेखील रविवारी मतदान होईल. त्याचबरोबर सटाणा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५-अ च्या रिक्तपदासाठीदेखील रविवारीच मतदान होणार आहे. इगतपुरी नगरपरिषदेच्या एकूण ९ प्रभागातील १८ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण २४ हजार ४६८ मतदार असून त्यांच्यासाठी ३४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्र्यंबक नगरपरिषदेच्या एकूण ८ प्रभागातील १७ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण १० हजार ६१४ मतदार असून त्यांच्यासाठी १७ मतदान केंद्रांची व्यवस्था आहे.
जत नगरपरिषदेच्या एकूण १० प्रभागातील २० जागांसाठी ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण २४ हजार ५६० मतदार असून ३६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title:  Dahanu, Jawhar and Taloda will vote on December 17 instead of 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.