अपुऱ्या मनुष्यबळामुळे होतेय डहाणू पोलिसांची दमछाक ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:26 AM2021-03-09T00:26:00+5:302021-03-09T00:26:16+5:30
गुन्हेगारीचे प्रमाण वाढते : कार्यरत कर्मचारी, अधिकाऱ्यांवर दुप्पट ताण
शौकत शेख
डहाणू : गुजरात राज्याच्या सीमेवरील अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू पोलीस ठाण्यात अपुरे पोलीस बळ असल्याने वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच दिवसेंदिवस होणाऱ्या आंदोलन, उपोषण, मोर्चे, पेट्रोलिंग, नाकाबंदी तसेच राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी लागत आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर रात्रंदिवस काम करण्याची वेळ आली आहे.
झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या डहाणू तालुक्यातील सागरी किनाऱ्यावर वाणगाव, डहाणू, घोलवड अशी तीन पोलीस ठाणी आहेत. तर मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून तलासरी तसेच कासा पोलीस ठाणी आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून काही पोलीस ठाण्यांत मंजूर पोलीस संख्येपेक्षा पोलीस शिपाई, हवालदार, जमादार, सहाय्यक फौजदार, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक असे मनुष्यबळ कमी असल्याने या परिसरात चोरी, दरोडे, हत्या, बलात्कार इत्यादीसारख्या गुन्ह्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रात येणाऱ्या डहाणू पोलीस ठाण्यात ११७ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु येथे केवळ ५९ पोलीस आहेत. तर सात पोलीस उपनिरीक्षक पाहिजे, परंतु केवळ दोन आहे. डहाणू ही तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. हिंदू-मुस्लिम संमिश्र लोकवस्ती असलेल्या या संवेदनशील शहरात एकूण १८ शासकीय कार्यालये आहेत. याबरोबरच थर्मल पाॅवर स्टेशनसारखे मोठे प्रकल्प आहेत. डहाणू पोलीस ठाण्याला सहा किलोमीटर सागरी किनारा तसेच ११ किलोमीटर खाडीकिनारा आहे. दरवर्षी डहाणू पोलीस ठाण्याला २०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल होत असतात. तर काही राजकीय पक्षांकडून सातत्याने मोर्चे, उपोषण, रास्ता रोको, रेल रोकोसारखे आंदोलन होत असल्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांची धावपळ उडत आहे.
वाणगाव पोलीस ठाण्याला एकूण ४३ पोलिसांची गरज आहे. परंतु येथे केवळ ३४ पोलीस आहे. येथून काही पोलिसांची बदली झाली आहे, परंतु त्यांच्या जागेवर नवीन पोलीस आले नसल्याचे सांगितले जाते. तसेच घोलवड पोलीस ठाण्याला पुरेशा प्रमाणात म्हणजे ५० पोलीस तसेच दोन अधिकारी आहेत. परंतु येथील पोलीस ठाणे लहानशा भाड्याच्या इमारतीत असल्याने ते पोलिसांना अपुरे पडत आहे. तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या तलासरी पोलीस ठाण्यात ७० पोलीस कर्मचारी तसेच चार अधिकारी पुरेशा प्रमाणात आहे, तर कासा येथे पुरेसा प्रमाणात पोलीस बल आहे.
डहाणू पोलीस ठाण्यात पुरेशा प्रमाणात पोलीस आहेत. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून सर्वत्र शांतता आहे.
- गोविंद ओमासे, पोलीस निरीक्षक, डहाणू