डहाणूत शिक्षकांची पगारवाढ झाली रद्द
By admin | Published: May 29, 2017 05:46 AM2017-05-29T05:46:12+5:302017-05-29T05:46:12+5:30
विषय शिक्षकांच्या मंजूर पदाच्या २५ टक्के पदांना वेतन्नोती देणे आवश्यक असताना २०१४ साली ठाणे जिल्हा परिषदेने सरसकट
अनिरु द्ध पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : विषय शिक्षकांच्या मंजूर पदाच्या २५ टक्के पदांना वेतन्नोती देणे आवश्यक असताना २०१४ साली ठाणे जिल्हा परिषदेने सरसकट सर्वच पदांना वेतन्नोती लागू करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मात्र २०१६ साली प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अतिरिक्त विषय शिक्षकांची वेतन्नोती रद्द केल्याने या तालुक्यातील १५१ शिक्षकांचे वेतन घटले असून आता ६ वी ते आठवीच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायचे कुणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शिक्षकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इ. पहिली ते पाचवी व इ.सहावी ते आठवी अशा दोन स्तरावर अध्यापन चालते. बी.ए.बी.एड शिक्षकांना विषय शिक्षक या पदावर जुलै २०१४ मध्ये नेमणूक देऊन वेतन्नोती दिली होती. परंतु आता दोन वर्षानंतर डिसेंबर २०१६ मध्ये प्राथमिक शिक्षण संचालकांनी पत्राद्वारे असे कळविले की, जुलै २०१४ मध्ये शासनाची मान्यता न घेता व तसेच मंजूर पदाच्या २५ टक्के शिक्षकांना वेतन्नोती देणे आवश्यक असताना सरसकट सर्वांनाच ती दिली.ही अनियमितता दूर करण्यासाठी जिल्हा परिषदने या विषय शिक्षकांची वेतन्नोती एप्रिल २०१७ मध्ये काढून घेण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी कार्यवाही करून विषय शिक्षकांना उपशिक्षक पदावर आणून ठेवले आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विषयशिक्षकांची वेतन्नोती मात्र काढून घेतलेली नाही. त्यामुळे शाळा सुरु झाल्यावर इ. सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविणार कोण? असा प्रश्न आहे. गुणवत्तापुर्ण अध्यापन करण्यासाठी विषयशिक्षकांची नेमणूक करण्याचे निकष असताना पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल डहाणू तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
फक्त डहाणू तालुक्यातच का
इ. ९ वी च्या प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर हा वर्ग जिल्हा परिषदेला जोडण्याचे धोरण आखले जात आहे. मात्र विषय शिक्षक शिक्षकांचे काय याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तसेच या आदेशाची अंमलबजावणी फक्त डहाणू तालुक्यातच झाल्याने विषय शिक्षकात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या परिपत्रकाची अमलबजावणी केली असून, जिल्ह्यात ती अन्य तालुक्यातही होईल.
-अनिल सोनार , गटशिक्षणाधिकारी , डहाणू पंचायत समिती शिक्षण विभाग