परेच्या विरोधात डहाणू-वैतरणा प्रवासी एकवटले

By admin | Published: July 17, 2017 01:01 AM2017-07-17T01:01:25+5:302017-07-17T01:01:25+5:30

पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्याकडून उपनगरीय सेवेच्या नावाखाली लाखो रु पयांची लूट करणारे रेल्वे प्रशासन

Dahanu-Vaitarna traveled together against Parichay | परेच्या विरोधात डहाणू-वैतरणा प्रवासी एकवटले

परेच्या विरोधात डहाणू-वैतरणा प्रवासी एकवटले

Next

लोकमत न्युज नेटवर्क
पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्याकडून उपनगरीय सेवेच्या नावाखाली लाखो रु पयांची लूट करणारे रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडीतून दररोजचा प्रवास करणाऱ्या पासधारका कडून मोठा दंड वसूल करीत आहे. ही प्रवृत्ती म्हणजे ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ असाच काहीसा प्रकार असल्याने डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेने आता ह्या प्रवृत्ती विरोधात लढण्याचा पवित्रा उचलला आहे.
सन १९९९ मध्ये रेल्वे प्रशासनाने डहाणू स्टेशन पर्यंतचा भाग उपनगरीय क्षेत्र म्हणून घोषित करून कर रु पी अधिभार वसुलीला सुरुवात केली आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवाश्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला १४ वर्षाचा कालावधी लागला. ह्या १४ वर्षात प्रवाश्याना पुरेश्या सोयीसुविधा न पुरवता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकडून जे कोट्यवधी रुपये वसूल केले ही बेकायदेशीर वसुली असल्याचे प्रवाश्याचे म्हणणे आहे. आजही पहाटे ५ वाजल्याच्या नंतरच लोकल सेवा सुरू होत असल्याने अनेक दैनंदिन कर्मचारी, भाजी विक्रेत्या महिला, विविध आस्थापना मध्ये काम करणारे अधिकारी ह्यांना वेळेवर उपस्थित राहता येत नाही. त्याचा परिणाम नोकरी, व्यवसायावर पडत असल्याने अनेक प्रवाशी ५ च्या आधी येणाऱ्या सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस, लोकशक्ती एक्स्प्रेस, सौराष्ट्र मेल आदी लांब पल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करीत असत. मात्र, आता ह्या गाड्याना सुपरफास्टचा दर्जा दिल्याने त्यातून प्रवास करणाऱ्या मासिक, त्रैमासिक पासधारकाना बेकायदेशीर ठरवून त्यांच्या कडून दंडापोटी मोठी वसुली केली जात आहे.
आजही वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या स्टेशन वरील इंडिकेटर्स सुरूच झाले नसून पाणी पिण्याची सोय, पादचारी पूल, प्लॅटफॉर्म वरील पत्रे नसणे, अनेक शौचालये तुंबलेले असणे अशा अनेक समस्या येथील प्रवाशांना निमुट सहन करव्या लागत आहेत. असे असतांना उपनगरीय सेवेच्या नावावर त्याच प्रवाशांकडून करवसुली केली जात आहे. त्यामुळे प्रथम रेल्वे प्रशासनाने पहाटे १ ते २ वाजल्यापासून लोकल सेवा सुरू करावी आणि नंतरच प्रवाश्याकडून दंड वसुली करावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.
बुधवारी पहाटे लोकल किंवा शटल उपलब्ध नसल्याने मुंबईला कामावर चाललेल्या ललित राऊत यांनी पहाटे लोकशक्ती एक्स्प्रेस पकडून ते बोरिवली स्थानकावर उतरले असता तिकीट तपासनीसांनी त्यांच्याकडे तिकीटाची मागणी केली, तसे राऊतांनी आपला त्रैमासिक पास दाखवला.मात्र त्यांनी हा पास चालणार नाही असे सांगत त्यांच्या कडून ३५० रु पयांचा दंड वसूल केला. एकतर पहाटे लोकल किंवा शटल सेवा सुरू करायची नाही आणि दुसरीकडे दंड वसूल करायचा ह्या जुलमी प्रवृत्ती विरोधात प्रवाश्या मध्ये संतप्त भाव उमटत आहेत. हा सवाल फक्त ललित राऊत यांचा नसून डहाणू ते वैतरणा दरम्यान याच वेळी प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा असून फक्त सेवा कर घेण्याऐवजी येथील प्रवाशांना निदान पुरेश्या सेवा पुरवा अन्यथा मागे झालेल्या तीव्र आंदोलनाची पुनरावृत्ती होईल असा इशारा डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने दिला आहे. प्रवाश्यांच्या विविध मागण्यांना धरून आज संस्थेच्या पदाधिकार्यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन विविध सेवा पुरवण्यासाठी लक्ष घालावे व येथील प्रवश्यांवर होत असलेला अन्याय दूर करावा असे आशयाचे निवेदनही संस्थेमार्फत देण्यात आले आहे.

Web Title: Dahanu-Vaitarna traveled together against Parichay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.