ठाण्यात बॅनरबाजीचा 'काला'! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:54 PM2022-08-19T12:54:23+5:302022-08-19T12:57:15+5:30
कोरोनाच्या संकटानंतर यंदा पुन्हा एकदा जल्लोषात दहीहंडीचा उत्साह राज्यभर साजरा होताना दिसत आहे. पण दहीहंडी म्हटलं की ठाणे हे समीकरण गेल्या अनेकवर्षांपासूनचं आहे.
ठाणे-
कोरोनाच्या संकटानंतर यंदा पुन्हा एकदा जल्लोषात दहीहंडीचा उत्साह राज्यभर साजरा होताना दिसत आहे. पण दहीहंडी म्हटलं की ठाणे हे समीकरण गेल्या अनेकवर्षांपासूनचं आहे. ठाण्यात दहीहंडी पथकांवर लाखो रुपयांचा वर्षाव होत असतो. यात राज्यभरातून विविध पथकं ठाण्यात थरांवर थर रचण्यासाठी येतात. यंदा राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचंही प्रतिबिंब दहीहंडी उत्सवात पाहायला मिळत आहे. ठाण्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्याच्या मानाच्या हंडीच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण या बॅनरमधून उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला आहे.
Live: राज्यातील दहीहंडी उत्सवाचा लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टेंभी नाका दहीहंडीच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा दाखल देत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. "मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही", हे बाळासाहेबांचा विधान आणि त्यासाठी त्यांची स्वाक्षरी असे बॅनर लावण्यात आले आहेत. तसंच बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे.
शिवसेनेला जागा कमी पडत असतील तर NCP सोबत जाणार का? असा प्रश्न बाळासाहेबांना विचारण्यात आला होता. ''NEVER-NEVER शत्रू हा शत्रूच असतो'', असं उत्तर त्यावेळी बाळासाहेबांनी दिलं होतं. याचीच आठवण करुन देणारा बॅनर लावण्यात आला आहे. बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची स्वाक्षरी. त्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो छापण्यात आला आहे.
VIDEO: ठाण्यात बॅनरबाजीचे थरावर थर! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा pic.twitter.com/5YK8lPyR6P
— Lokmat (@lokmat) August 19, 2022
टेंभी नाका येथे एकनाथ शिंदेंची दहीहंडी तर जांभळी नाका येथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले खासदार राजन विचारे यांची दहीहंडी आहे. या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत. अशाप्रकारे ठाण्यात दहीहंडीसोबतच एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांचे बॅनरबाजीचेही थरावर थर रचताना दिसत आहेत.