निर्बंधांमुळे घटणार गोविंदा पथकांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:26 AM2017-07-27T00:26:50+5:302017-07-27T00:26:54+5:30
दहीहंडी उत्सवातील आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे उत्सव साजरा करणाºया आयोजकांची संख्या यंदा आणखी कमी होण्याची भीती सध्या गोविंदा पथकांना भेडसावते आहे
ठाणे : दहीहंडी उत्सवातील आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे उत्सव साजरा करणाºया आयोजकांची संख्या यंदा आणखी कमी होण्याची भीती सध्या गोविंदा पथकांना भेडसावते आहे. भविष्यात ही संख्या कमी कमी होत गेल्यास दहीकाला उत्सव साजरा करण्याची परंपरा लयास जाईल, अशी चिंता गोविंदा पथकांना सतावत असल्याचे ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी सांगितले.
दहीहंडी उत्सवात न्यायालयाने आणलेल्या १८ वर्षांच्या मर्यादेची बंदी आणि २० फुटापर्यंतच्या उंचीच्या निर्बंधाबाबत १ आॅगस्टला निर्णय होणार आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने गोविंदा पथकांविरोधात निर्णय दिल्यास सरकार अध्यादेश काढून गोविंदा पथकांच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास गोविंदा पथकांना वाटतो. परंतु गोविंदा पथकांवरील अटी-निर्बंध शिथील झाले आणि आयोजकांवरील अटी कायम राहिल्यास छोट्या प्रमाणात उत्सव आयोजन करणाºयांची संख्या नगण्य होईल. याचा अर्थातच परिणाम पथकांच्या सहभागावरही होण्याची शक्यता आहे. गोविंदा पथकांवर २०१४ साली आलेल्या निर्बंधांपासून पथकांची संख्या कमी होत चालली आहे. आता ठाण्यात २०० गोविंदा पथक सहभागी होतात. तसेच, छोट्या प्रमाणात उत्सव साजरा करणारे आयोजक १०० ते १५० च्या आसपास आहेत.
सुरक्षा, आवाजाची मर्यादा यांसारख्या विविध अटींमुळे आयोजकांवर आलेल्या बंधनांमुळे हंडीच्या आयोजनाचे प्रमाण कमी होईल, असे समन्वय समितीचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने जवळपास ४० टक्के आयोजक बॅकफूटवर गेले होते. यंदाही त्यांच्यावरील अटी कायम राहिल्या, तर अनेक छोटे आयोजक उत्सवाचे आयोजन करणार नाहीत, असे महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पारंपरिक उत्सव साजरा करा!
जशी गोविंदा पथकांवर आलेल्या अटींमुळे पथकांची संख्या कमी होत आहे तशीच आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे छोट्या प्रमाणात आयोजन करणाºयांची संख्याही कमी होत असल्याची नाराजी गोविंदा पथकांनी व्यक्त केली. बक्षिसाच्या रकमेसाठी गोविंदा पथके उत्सवात सहभागी होत असतात, असे सामान्यांना वाटत असते. पण याच रकमेतून आम्ही वर्षभर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित असतो, याकडे पेंढारे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे छोट्या आयोजकांनी मागे न हटता किमान पारंपरिक पद्धतीने उत्सवाचे आयोजन तरी करावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.