दहिसर येथील धाडीत १४ बारबालांसह २४ जणांना अटक, डायघर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 03:32 AM2019-08-20T03:32:38+5:302019-08-20T03:33:05+5:30
डायघर परिसरातील दहिसर येथील रॉयल गोल्ड बारमध्ये नियमांपेक्षा जास्त बारबाला लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती.
ठाणे : रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पिंपरीनाका, दहिसर (डायघर) येथील एका बारवर डायघर पोलिसांनी रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून १४ बारबालांसह २४ जणांना अटक केली. या सर्वांची ठाणे न्यायालयाने वैयक्तिक जामिनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डायघर परिसरातील दहिसर येथील रॉयल गोल्ड बारमध्ये नियमांपेक्षा जास्त बारबाला लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आदींच्या पथकाने १८ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास या बारवर छापा टाकून बारमालक इंद्रमणी त्रिपाठी (४२, रा. परेल, मुंबई), व्यवस्थापक सुरेश मोगवीरा (३८, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), डॅनिअल सरकार, प्रदीप मालिक, अमितकुमार कुमी, भागीरथ दास आणि पवन सिंह हे कर्मचारी तसेच चार गिºहाइके आणि १४ बारबाला आदी २४ जणांना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी बीभत्स वर्तन केल्याप्रकरणी या बारबालांवर तसेच विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवून नियमांपेक्षा जास्त मुलींना रात्रीच्या वेळी कामावर ठेवल्याप्रकरणी बारमालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व बारबालांसह बारमालक आणि व्यवस्थापक आदी २४ जणांची प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे एक लाख ४४ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर न्यायालयाने सुटका केली.