आरटीईच्या विद्यार्थ्यांची दैना; पालकांची पोलीस ठाण्यात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:37 AM2019-06-19T01:37:21+5:302019-06-19T01:37:29+5:30
शुल्क मागितल्याने संताप
कल्याण : शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५ टक्के प्रवेश आरक्षित आहेत. या आरक्षणांतर्गत विविध शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खाजगी शाळा पैशांची मागणी करत असून, सोयी-सुविधाही नाकारत आहेत. याविरोधात संतप्त पालकांनी मंगळवारी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी केडीएमसीचे शिक्षणाधिकारी जे. जे. तडवी यांच्याशी संपर्क साधून तोडगा न काढल्यास प्रशासनासह शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. त्यानंतर पालकांनी मुख्यालयातील शिक्षण मंडळ कार्यालयात जाऊ न तडवी यांची भेट घेतली. याबाबत दोन दिवसांत शाळांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिक्षण आरोग्य अधिकार मंचाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन धुळे यांनी शिक्षण हक्क कायद्यासाठी लढा सुरू केला आहे. यासाठी त्यांनी महापालिकेविरोधात मोर्चाही काढला होता. पालकांनी तक्रारी केल्यानंतर पालकांसह धुळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पालक रुपाली बोरड, संगीता गुप्ता, दीपाली साळवी, जयश्री पगारे, जया धात्रक, सुजाता ढवळे, निवेदिता पवार, सुजाता चव्हाण आणि आयेशा शेख यांच्यासह ५० पालक उपस्थित होते.
शिक्षणहक्क कायद्याला शाळा जुमानत नाहीत. या कायद्यानुसार विद्यार्थ्यांची सरकारकडून फी मिळणार आहे; मात्र शाळा विद्यार्थ्यांकडे त्याची मागणी करत आहेत. ही फसवणूक असून केडीएमसीचा शिक्षण विभाग आणि शाळांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आरटीईचे अनुदान शासनाकडून नियमीत स्वरूपात मिळत नसल्याने शैक्षणिक सोयी सुविधा देता येत नसल्याचे स्पष्टीकरण शाळांनी दिले आहे.
केडीएमसीच्या हद्दीत आरटीई प्रवेशांसाठी दोन हजार ६३५ आॅनलाइन अर्ज आले होते. ८१ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी एक हजार ४९६ आणि नर्सरीसाठी एकच शाळा असून त्यात १३ प्रवेशक्षमता आहे. पहिल्या फेरीत ७२३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी ४९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर अपेक्षित शाळेत प्रवेश न मिळाल्याने निवड होऊनही २२६ प्रवेश घेतला नाही. दुसरी फेरी सुरू असून दोन दिवसांत किती प्रवेश होतात, याचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी तडवी यांनी यासंदर्भात दिली.
मुलाला चड्डी-बनियानवर पाठवले शाळेत
कल्याण पूर्वेतील रिक्षाचालक मनोज वाघमारे यांचा मुलगा मयूर याने ‘आरटीई’अंतर्गत आनंद ग्लोबल स्कूलमध्ये प्रवेश मिळाला आहे. शाळेने त्याला गणवेश नाकारल्याने वाघमारे यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी मयूरला चड्डी-बनियानवर शाळेत पाठवून निषेध केला आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाकडे संपर्क साधला असता प्रभारी मुख्याध्यापक सुनील मोगरे म्हणाले की, मयूरचे पालक आले होते; मात्र त्यांचा शाळेच्या संचालकांशी संपर्क झाला नाही. नियमाप्रमाणे त्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिला जाणार आहे.