काळू नदीवरील बंधाऱ्याला गळती?; लाखो लीटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:30 AM2020-02-04T00:30:34+5:302020-02-04T00:31:15+5:30
तातडीने डागडुजी न केल्यास पाणीटंचाईची भीती
टिटवाळा : शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी काळू नदीवर टिटवाळा-गुरवली रस्त्यावर लघुपाटबंधारे विभागाने बांधलेल्या के.टी. बंधाºयाला गळती लागली आहे. पाणी अडवून एक महिन्याच्यावर कालावधी उलटून गेला, तरीही यावर संबंधित विभागाकडून उपाययोजना करण्यात न आल्याने लाखो लीटर पाणी सध्या येथून वाया जात आहे. त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना न केल्यास मे महिन्याच्या अगोदरच शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता आहे.
काळू नदीवर १९८० मध्ये स्वतंत्र पाणीयोजनेसाठी लघुपाटबंधारे विभागाकडून के.टी. बंधारा बांधण्यात आला. यानंतर, कल्याण-डोंंबिवली महापालिकेने काळू नदीवर २००३ मध्ये सुमारे तीन कोटी रुपये खर्चून साडेसात दशलक्ष क्षमतेची टिटवाळा व मांडा परिसरासाठी स्वतंत्र पाणीयोजना उभारली. महागणपती मंदिराच्याजवळ काळू नदीवर केटी बंधाºयाच्या पाणीसाठ्यावर आधारित ही पाणीयोजना सुरू करण्यात आली. टिटवाळा शहराला दररोज चार एमएलडी इतका पाणीपुरवठा या योजनेतून केला जातो.
मात्र, गेल्या महिनाभरापासून या बंधाºयाच्या बंद केलेल्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. यामुळे ही गळती भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे करू शकते, अशा प्रकारची भीती नगरसेवक संतोष तरे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करणार असल्याचे तरे यांनी सांगितले.
मनसेचे प्रभाग क्र . ९ चे शाखाध्यक्ष मिलिंद सावंत म्हणाले की, ‘या समस्येबाबत संबंधित विभागाकडून नियमित पाहणी तसेच डागडुजी केली जात नाही. त्यामुळे या बंधाºयाला पडलेल्या भगदाडातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तसेच बंधारा कमकुवत होऊन तो तुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची बाब एका निवेदनाद्वारे केडीएमसी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.’
दरम्यान, ही गळती अशीच चालू राहिली तर मे महिन्यापूर्वीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असे येथील नागरिक प्रशांत गोडांबे यांनी सांगितले.
काळू नदीवरील के.टी. बंधाºयातून पाणीगळती होत असल्याबाबत आपल्याकडे माहिती आली आहे. यापूर्वी बंधाºयाच्या पिलरला जॅकेटिंग रूअर्टिंग करण्यात आले होते. दुरुस्तीचे काम प्रस्तावित असून ते लवकरच मार्गी लागणार आहे.
-पूनम पाटील, अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवा