नुकसान १६८ कोटी, भरपाई फक्त ६७ कोटी
By admin | Published: December 22, 2015 12:15 AM2015-12-22T00:15:24+5:302015-12-22T00:15:24+5:30
कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते.
हितेन नाईक, पालघर
कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते. यावेळी १ लाख ८० हजार ९९६ एकर क्षेत्रातील १ लाख ८१ हजार ९११ शेतकऱ्यांचे सुमारे १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराचे नुकसान झाले होते. तिच्या भरपाईपोटीे या शेतकऱ्यांना केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजार रू.ची तुटपुंजी भरपाई दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यात सर्वाधिक आंबा व काजूचे उत्पादन घेणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार ८७४ शेतकऱ्याच्या ८० हजार ५३६.५३ एकर क्षेत्रातील आंबा व काजूचे ७९ कोटी ५३ लाख ७५ हजाराचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले होते. मात्र शासनाने केवळ २५ कोटी ९३ लाख ५७ हजार रू. ची भरपाई दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात ४ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४०१.९५ एकर क्षेत्रात ४ कोटी १९ लाख ५३ हजाराचे नुकसान झाले असून २ कोटी ७२ लाख १२ हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील ४६ हजार २४३ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ९६५.३५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू, पिकाच्या ३७ कोटी ९१ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी शासनाने १३ कोटी ५ लाख १६ हजार रू.ची भरपाई मंजूर केली आहे तर रायगड जिल्ह्यात ४३ हजार ५८९ शेतकऱ्यांच्या ४३ हजार ७७३.१५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू च्या ४३ कोटी ७९ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी १५ कोटी ८५ लाख ५३ हजाराची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील एकूण १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराच्या नुकसानीपैकी केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजाराची भरपाई बागायतदारांना मिळणार आहे. उर्वरीत १०० कोटी ८८ लाख ४० हजाराची नुकसान भरपाई कशी होणार व कोण भरून देणार असा प्रश्न बागायतदारांमधून उपस्थित केला जात असून शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याची टीका होत आहे.