ठामपा मुख्यालय आवारात झाड पडल्यामुळे आठ दुचाकींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:53+5:302021-07-22T04:24:53+5:30
ठाणे : शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडत असताना बुधवारी दुपारी चक्क ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेट नंबर ४ येथे ...
ठाणे : शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडत असताना बुधवारी दुपारी चक्क ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेट नंबर ४ येथे एक झाड भिंतींसह कोसळले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी तेथे उभ्या असलेल्या आठ दुचाकी वाहनांवर झाडे पडल्याने त्यांचे नुकसान झाले.
शहरात बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत १८ ठिकाणी झाडे पडली असून यात कळव्यात रस्त्यावर भंगार अवस्थेत उभ्या रिक्षावर झाड पडले. तसेच ते रस्त्याच्या मधोमध पडल्याने त्या परिसरात काही वेळ वाहतूककोंडी झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तसेच कळवा आणि ठामपा मुख्यालयाच्या आवारात पडलेली झाडे ही जुनी आणि मोठी होती असे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने दाणादाण उडवली आहे. त्यातच शहरातील बहुतांश ठिकाणच्या सखल भाग जलमय झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यातच मंगळवारी ते बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ठाणे शहरात एकूण १८ ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. यामध्ये नऊ गाड्यांचे नुकसान झाले आहे.