ठाण्यात महायुतीला रिपाइंचा धक्का, आघाडीचा प्रचार करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 04:49 AM2019-04-26T04:49:25+5:302019-04-26T04:50:23+5:30
रिपाइं आठवले गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या झालेल्या अपमानानंतर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने महायुतीविरोधात बंडांचा झेंडा हाती घेतला आहे.
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी रिपाइं आठवले गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या झालेल्या अपमानानंतर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने महायुतीविरोधात बंडांचा झेंडा हाती घेतला आहे. मागील १० वर्षे आम्ही शिवसेनेबरोबर आहोत. मात्र, त्यांची मनुवादीवृत्ती अद्यापही बदलली नसल्याचा आरोप रिपाइंचे जिल्हा प्रवक्ते विकास चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. यामुळेच पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सेनेविरोधात प्रचार करून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, पुरोगामी विचारसरणी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार सर्व रिपाइं कार्यकर्ते करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी सायंकाळी राजन विचारे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रिपाइंचे ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरच्या जिल्हाध्यक्षांना मागच्या रांगेत बसवले. त्यामुळे रिपाइंचे पदाधिकारी नाराज झाले. त्यानंतर जिल्हाध्यक्षांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. प्रचारपत्रके, जाहीरनाम्यावर डॉ. आंबेडकरांच्या छायाचित्रांसह पक्ष जिल्हाध्यक्षांंच्या फोटोस योग्य सन्मान न मिळण्यासह वारंवार आमच्या नेत्यांचा अवमान होत आहे. प्रचाराच्या पत्रकार परिषदा, चौकसभांचे निमंत्रण दिले जात नाही. त्यामुळे, आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतो आहोत.
जिल्हाध्यक्षांचा वारंवार होणारा अपमान आम्ही सहन करत नसल्याचे सांगून महायुतीविरोधात उघडउघड बंड पुकारल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यावर कारवाई झाली तरी, तिला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांत भ्रष्टाचार सुरू आहे. अशांसोबत आम्ही कसे जायचे, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आजपासूनच आम्ही जितेंद्र आव्हाडांसह आनंद परांजपे यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक शिवसेना नेत्यांसह शिवसैनिक राजन विचारे यांच्यावर नाराज आहेत. वाघबीळ गावातील रहिवाशांनी तर त्यांची रॅली पिटाळून लावली. त्यानंतर, आता महायुतीचा घटक असलेल्या रिपाइंच्या बंडामुळे राजन विचारे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महायुतीतील अंतर्गत वाद होता, तो सोडवण्यासाठी चर्चा सुरू होती. परंतु, मला न सांगता कार्यकर्त्यांनी जी काही भूमिका घेतली आहे, त्याबाबत रामदास आठवले यांच्या कानांवर घातले जाईल. शिवाय, त्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्यानुसार त्यांच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. - रामभाऊ तायडे, जिल्हाध्यक्ष, रिपाइं, आठवले गट