कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन वाहनांसह दुकानांचेही नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:07+5:302021-05-24T04:39:07+5:30
ठाणे : घोडबंदर रोडमार्गे ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात उभ्या असलेल्या दोन ...
ठाणे : घोडबंदर रोडमार्गे ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात उभ्या असलेल्या दोन वाहनांसह दोन दुकानांना या कंटेनरने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर चालकाने कंटेनर सोडून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जेएनपीटी येथे माल उतरविल्यानंतर पुन्हा ठाण्याच्या दिशेने घोडबंदर रोडने रविवारी सकाळी जाणारे रिलायबेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस या कंपनीचे कंटेनर ओवळा नाका येथे आले असता चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. यात दोन झाडे, रियाज यांच्या न्यू गरीब नवाज केटरर्स आणि नदीम यांच्या ड्रीम मेन्स सलून या दोन दुकानांनाही कंटेनर धडकले. त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या हार्मोनी रेसिडेन्सी येथील आशिष मिस्त्री आणि कृष्णा साळुंके यांच्या दोन मोटारकारलाही या कंटेनरची धडक बसली. यामध्ये दोन्ही दुकानांसह दोन्ही मोटारकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी मदतकार्य राबविले.
या घटनेनंतर काही नागरिकांनी कंटेनर चालकाला मारहाण केली. त्यानंतर तो तिथून पसार झाला. कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एरव्ही, ओवळा नाका येथे मोठी वर्दळ असते. हा अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात चालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.