डान्सबार, हॉटेलांची, हुक्का पार्लरची अवैध बांधकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:04 AM2018-03-30T02:04:08+5:302018-03-30T02:04:08+5:30
डान्सबार, हुक्का पार्लर, हॉटेलांनी उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली असून तेथील छुप्या खोल्यावर कारवाई करा
उल्हासनगर : डान्सबार, हुक्का पार्लर, हॉटेलांनी उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली असून तेथील छुप्या खोल्यावर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने महासभेत केली. यातून अवैध बांधकामाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. आयुक्तांचा आदेश धाब्यावर बसवून शेकडो अवैध बांधकामे उभी राहत असून अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याची टीकाही करण्यात आली.
यापूर्वी पोलीस उपायुक्तांच्या पत्रानुसार महापालिकेने डान्सबार, हुक्का पार्लर व हॉटेलमधील छुप्या खोल्या तोडल्या होत्या. नंतर पालिकेने दुर्लक्ष केल्याने त्यातील अनेक अवैध बांधकामे पुन्हा उभी राहिली. तोच संदर्भ विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे यांनी दिला. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी युवराज भदाणे यांनी अवैध बांधकामे झाल्याचा इन्कार केला. त्यातील काहींनी न्यायालयातून स्थगिती आदेश आणल्याचे सांगितले.
तेव्हा भाजपाचे नगरसेवक मनोज लासी, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी व विरोधी पक्षनेता धनजंय बोडारे यांनी भदाणे यांना धारेवर धरले. ‘महासभेत चुकीची माहिती देऊ नका. महापौर, तुम्ही माझ्यासोबत चला. आधी तोडलेल्या छुप्या अवैध खोल्या पुन्हा जशाच्या तशा उभ्या राहिल्याचे दाखवून देतो,’ असे आव्हान लासी यांनी दिले. त्यामुळे भदाणे यांना कारवाईचे आश्वासन द्यावे लागले.