दांडगा जनसंपर्क, विकासकामे महायुतीच्या पथ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:11 AM2019-05-27T01:11:26+5:302019-05-27T01:29:56+5:30
कल्याण पूर्व मतदारसंघ हा बालेकिल्ला असल्याची ओळख महायुतीने पुन्हा सार्थ करून दाखवली आहे.
- प्रशांत माने
कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघ हा बालेकिल्ला असल्याची ओळख महायुतीने पुन्हा सार्थ करून दाखवली आहे. २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना १७ हजार ५०६ मते अधिक मिळाली आहेत, तर बाबाजी पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीच्या मतांमध्ये केवळ दोन हजार १६२ मतांची वाढ झाली आहे. शिवसेना आणि भाजपचा दांडगा जनसंपर्क आणि केलेली विकासकामे शिंदे यांच्या पथ्यावर पडली आहेत, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा या मतदारसंघात नसलेला प्रभाव बाबाजींसाठी नुकसानकारक ठरला आहे. तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या वंचित आघाडीलाही याठिकाणी बºयापैकी मते (१७ हजार ९९७) मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदा तब्बल पाच लाख ५९ हजार ७२३ मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने पराभव केला. पाटील यांना दोन लाख १५ हजार ३८० मते मिळाली. या मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांना मिळालेली ६५ हजार ५७२ मते आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसाठी चिंतनाची बाब अधोरेखित करणारी ठरली आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघाचा आढावा घेता शिवसेनेच्या शिंदे यांना ८९ हजार २६९ मते मिळाली आहेत. २०१४ मध्ये त्यांना येथून ७१ हजार ७६३ मते मिळाली होती. यंदा १७ हजार ५०६ मते अधिक मिळाली आहेत. तर, राष्ट्रवादीच्या पाटील यांना २७ हजार ५५५ मते मिळाली आहेत. गेल्या वेळेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना २५ हजार ३९३ मते मिळाली होती. यात यंदा दोन हजार १६२ मतांची भर पडली आहे. २०१४ ला याठिकाणी एक लाख ४१ हजार ४१३ मतदारांनी मतदानाचा हक्कबजावला होता. त्यावेळी ४५.२३ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र एक लाख ४३ हजार २६३ मतदान झाले होते. मतांची टक्केवारी ४२.११ इतकी होती. यंदा मतदान तीन टक्क्यांनी घसरले. पण, याचा शिवसेनेला फारसा फटका बसलेला नाही. उलट, यंदा शिवसेनेला मिळालेल्या मतांमध्ये वाढ झाली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातील राजकीय स्थिती पाहता हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला, तरी दोन विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड निवडून आले आहेत. सध्या त्यांची ओळख भाजपचे सहयोगी आमदार म्हणून आहे. त्यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. त्याचाही लाभ महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मते मिळवून देण्यासाठी झाला आहे. केडीएमसीच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली नव्हती. त्यावेळी कल्याण पूर्वेतून शिवसेनेचे तब्बल १८ नगरसेवक निवडून आले. भाजपचे आठ नगरसेवक असून बसपच्या उमेदवार म्हणून निवडून आलेल्या सोनी अहिरे यांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. शिवसेना-भाजपच्या या मतदारसंघातील ताकदीचेही शिंदे यांच्या विजयाला पाठबळ मिळाले आहे. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे हे पूर्वेतील नेतृत्व असले, तरी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाही. जिल्हा नेतृत्वाचे दुर्लक्ष आणि महापालिका तोंडावर असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप आणि शिवसेनेची धरलेली वाट हे मुद्दे पूर्वेत पक्षाच्या पानिपताला कारणीभूत ठरले.
>विधानसभेवर काय परिणाम?
आमदार गणपत गायकवाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले समजले जातात. त्यांचे एकनाथ शिंदे यांच्यासमवेतही घनिष्ठ संबंध आहेत. आता लोकसभेनंतर येणाºया विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करू पाहणारे गायकवाड पुन्हा अपक्ष म्हणून लढतात की, कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यावर विधानसभेची गणिते अवलंबून असतील.
>की फॅक्टर काय ठरला?
पूर्वेतील ग्रामीण पट्ट्यात बोअरवेल, हातपंप, नळ तसेच आॅस्ट्रेलियन टाकीद्वारे पाणीपुरवठा आदी खासदार निधीतून योजना राबवल्या. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. ही बाब श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सकारात्मक ठरली.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या प्रचारसभेमध्ये महायुतीच्या भाजप, आरपीआय यासह शिवसेना कार्यकर्त्यांची झुंबड दिसून आली. तेथे श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केलेले आवाहन हे सगळ्यांच्या पसंतीस उतरल्याने त्यांच्या पारडयात मतांचे दान भरभरून टाकले.
मनसेतील शरद गंभीरराव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह याच सभेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला खिंडार पडले.
दिव्यांगांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भरवलेले महाशिबिर. सुमारे एक हजारांहून अधिक लाभार्थ्यांना सरकारी योजनेतून विनामूल्य साहित्यवाटप. यात कृत्रिम अवयव, हिअरिंग एड, थ्रीव्हीलर, व्हीलचेअर, ब्रेल किट अशी विविध प्रकारची मदत केली आहे.