दांडीबहाद्दर नगरसेवकांचे प्रश्न घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:15 AM2021-02-21T05:15:42+5:302021-02-21T05:15:42+5:30
ठाणे : सर्वसाधारण सभेत लेखी प्रश्न देऊन प्रश्नोत्तराच्या तासांत अनुपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे यापुढे प्रश्न पुन्हा न घेण्याचा निर्णय ...
ठाणे : सर्वसाधारण सभेत लेखी प्रश्न देऊन प्रश्नोत्तराच्या तासांत अनुपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे यापुढे प्रश्न पुन्हा न घेण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जाहीर केला आहे. नगरसेवक प्रश्न विचारतात. मात्र, त्यांची उत्तरे घेण्यासाठी हजरच राहत नसल्याने लोकप्रतिनिधींबाबत संशयाचे वातावरण निर्माण केले जात असून, त्यामुळे अशा दांडीबहाद्दरांचे प्रश्न पुन्हा घेऊ नयेत, असे आदेश त्यांनी सर्वसाधारण सभेत दिले.
सर्वसाधारण सभेचा सुरुवातीचा एक तास हा लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरूपात दिलेल्या प्रश्नांची अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळावीत यासाठी राखीव ठेवला जातो. यामध्ये अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती समाधानकारक नसल्यास यावर नगरसेवकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते. मात्र, गेल्या काही महासभांत लोकप्रतिनिधी प्रश्न विचारतात; परंतु त्यांची उत्तरे घेण्यासाठी सभागृहात उपस्थितच राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाल्याने अखेर महापौरांनी जे नगरसेवक प्रश्न विचारून सभागृहात उपस्थित राहणार नाहीत, त्यांचे प्रश्न यापुढे न घेण्याचे जाहीर करून टाकले.
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी बहुतांश महापालिका अधिकारी हजर नसायचे. त्यावेळी तत्कालीन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक केले होते. मात्र, आता प्रश्न विचारून काही लोकप्रतिनिधीच हजर राहत नसल्याने म्हस्के यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.