जेमतेम चार महिन्यांतच डांगे यांची झाली बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:12 AM2020-06-24T01:12:32+5:302020-06-24T01:12:43+5:30
लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींमुळे मंगळवारी त्यांची तडकाफडकी बदली केली गेली, अशी चर्चा आहे. आयुक्तपदी सनदी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती केली आहे.
धीरज परब
मीरा रोड : अवघ्या चार महिन्यांपूर्वी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या चंद्रकांत डांगे यांच्या विरोधात काही लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींमुळे मंगळवारी त्यांची तडकाफडकी बदली केली गेली, अशी चर्चा आहे. आयुक्तपदी सनदी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती केली आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. राज्यात भाजप सत्तेत असताना तत्कालीन आ. नरेंद्र मेहता हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मर्जीतला आयुक्त मिळावा म्हणून शिफारस करीत. पण मर्जीतला आयुक्त मिळाला नाही की त्याच्या विरोधात मोहीम उघडत. डॉ. नरेश गीते यांनी दबाव झुगारल्याने त्यांना मेहता व स्थानिक भाजपचा विरोध सहन करावा लागला होता. तब्बल १६ महिने तग धरल्यावर गीतेंची बदली झाली व बी. जी. पवार आले. ते तीन महिनेही राहिले नाहीत. त्यांच्या जागी मेहतांच्या मर्जीतले बालाजी खतगावकर आले. परंतु मेहता आणि त्यांच्या कंपनीच्या वादांमुळे खतगावकर चांगलेच गोत्यात आले. भाजपची राज्यातील सत्ता गेल्यावर फेब्रुवारीमध्ये खतगावकरही गेले आणि १५ फेब्रुवारी रोजी डांगे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांचे जवळचे आयुक्त म्हणून डांगे यांची चर्चा झाली.
डांगे यांनी पालिकेत येताच मेहतांना धक्के देण्यास सुरुवात केली. झंकार कंपनी समोरील बेकायदा गाळे पाडायला लावल्यानंतर मेहतांच्या घर योजनेतील वाढीव बेकायदा बांधकामावरही कारवाईचा बडगा उगारला. पण न्यायालयाने स्थगिती दिल्याने कारवाई थांबली.
पालिका कारभारातही डांगे हे मेहता व समर्थकांचा हस्तक्षेप खपवून घेत नव्हते. पालिकेतील सत्ताधारी भाजपशी दोन हात करताना डांगे यांना शिवसेना नेतृत्वाची व स्थानिक लोकप्रतिनिधींची साथ मिळवता आली नाही, अशी चर्चा आहे.
आ. प्रताप सरनाईक यांनी डांगे यांच्यावर मनमानी कारभारासह लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचे आरोप लेखी पत्राद्वारे केले होते.
पालिकेतील आयुक्त आपल्या मर्जीतला हवा यावरुन शिवसेनेतील दोन दिग्गज नेत्यांमध्ये सुप्त स्पर्धा असल्याची चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात सुरु होती. एका विकासकाला टीडीआर देण्याच्या प्रकरणावरुन वाद वाढल्याचेही बोलले जात होते.
>‘अनलॉक १’ नंतर कोरोनाबाधितांची शहरात वाढली संख्या
डांगे यांची फेब्रुवारीत नियुक्ती झाली व मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. परंतु ‘अनलॉक १’नंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन अपयशी ठरल्याची झोड उठू लागली.त्यातच मंगळवारी अचानक महापालिका आयुक्तपदी डॉ. विजय राठोड यांची नियुक्तीची घोषणा केली गेली. डॉ. राठोड यांना त्वरित आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगितले आहे.डॉ. राठोड हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. ते थेट सनदी अधिकारी असून पालिका आयुक्तपदी झालेली ही त्यांची दुसरी नियुक्ती असल्याचे सांगण्यात आले.
>चंद्रकांत डांगे यांच्या बदलीचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्याबद्दल वाद नव्हता. सनदी अधिकारी द्या अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यांच्या बदलीशी संबंध नाही. कोरोनाच्या संसर्ग वाढल्याने बदली केली असावी. नवीन आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे. शहराला कोरोनापासून मुक्त करावे.
- आ. प्रताप सरनाईक, शिवसेना