भाजपा-सेनेसाठी धोक्याची घंटा

By admin | Published: May 27, 2017 02:17 AM2017-05-27T02:17:11+5:302017-05-27T02:17:11+5:30

काँग्रेसने स्वबळावर पालिकेत मिळवलेली सत्ता, भाजपाच्या जागांची दुप्पट झालेली संख्या हा शिवसेनेसाठी भिवंडीत धोक्याचा इशारा ठरला आहे.

The danger hour for the BJP-Sena | भाजपा-सेनेसाठी धोक्याची घंटा

भाजपा-सेनेसाठी धोक्याची घंटा

Next

पंढरीनाथ कुंभार/रोहिदास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी/अनगाव : काँग्रेसने स्वबळावर पालिकेत मिळवलेली सत्ता, भाजपाच्या जागांची दुप्पट झालेली संख्या हा शिवसेनेसाठी भिवंडीत धोक्याचा इशारा ठरला आहे. या पालिकेत घटलेल्या जागांमुळे पुढील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला जोरदार तयारी करावी लागणार आहे. त्याचवेळी भाजपाच्या उमेदवाराशी कडवी लढत देणाऱ्या काँग्रेसच्या शोएब गुड्डू यांनी पालिकेच्या राजकारणावर उमटवलेला प्रभाव भाजपालाही विधानसभेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
भिवंडी पश्चिम विधासनभा मतदारसंघात काँग्रेसचे शोएब गुड्डू यांनी भाजपाचे महेश चौघुले यांना कडवी लढत दिली होती, त्याच गुड्डू यांनी स्थानिक राजकारणावर अडीच वर्षांत पुन्हा पकड निर्माण केली आहे. तर भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे रूपेश म्हात्रे यांना दोनदा विजय मिळूनही या मतदारसंघातील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या १२ वरून आठ झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचा एकहाती विजय ही शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे.
सेनेला गटबाजी भोवली
शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील विसंवाद, अंतर्गत गटबाजी आणि उमेदवारांचा फाजील आत्मविश्वास यामुळे शिवसेनेला आपल्या १६ जागा राखता आल्या नसल्याची कबुली शिवसेनेचे शहरप्रमुख सुभाष माने यांनी दिली. भिवंडीत मागील वेळी १६ नगरसेवक असूनही शिवसेनेला सत्तेतील वाटा मिळाला. भाजपाने सत्तेचा व पैशाचा वापर करून कार्यकर्ते-उमेदवारांना दाबण्याचा केलेला प्रयत्न, दुबार मतदारांची नावे, बोगस मतदान याचा फटका निवडणुकीत उमेदवारांना बसला. पक्षाने व्यूहरचनाही चांगली केली होती. पण मतदारांना गृहीत धरल्याने, अतीआत्मविश्वासामुळे केलेले दुर्लक्ष शिवसेनेच्या उमेदवारांना बोवल्याचे परखड मत त्यांनी मांडले. या पराभवाचे मंथन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युती असूनही कोणार्कला फटका
या पालिका निवडणुकीत कोणार्कला १४ जागांची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी भाजपासोबत युती केली. समजोता केला. पण त्यांच्या जागा मागील सहावरून कमी होत चारवर आल्या. कोणार्कला भाजपा, संघातून झालेला विरोध, ती आघाडी निवडणुकीनंतर भाजपात विलीन होईल असा भाजपाने केलेला प्रचार आणि मागील सत्ताकाळात त्यांनी केलेल्या कामांबद्दल असलेली नकारात्मक भावना यांचा एकत्र फटका कोणार्कला सोसावा लागला.
कोणार्कसोबत भाजपा, श्रमजीवी संघटना होती. मुख्यमंत्र्यांनीही कोणार्कच्या उमेदवारांसाठी सभा घेतली. त्याचा फायदा उचलण्याची रणनिती ठरवण्यात आली. तरीही दोन जागांचा फटका बसला. आमचे काम नाकारले गेले. मागील वेळी कोणाशी युती नसताना कोणार्कने सहा जागा मिळवल्या होत्या. आता युती करून त्या घटल्याचे कारण शोधले जाईल, असे कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख विलास पाटील म्हणाले.
समाजवादीचाच चमत्कार
विद्यमान नगरसेवकांना नाकरून, राष्ट्रवादीला सोबत घेऊनही समाजवादी पक्षाला चमत्कार दाखवता आला नाही. मागील निवडणुकीत १६ जागा मिळवणारा पक्ष आता दोन जागांवर आल्याचा मोठा धक्का पक्षाच्या नेत्यांना बसला आहे. खुद्द अबू आझमी येथून एकदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही पक्षाची इतकी दारूण अवस्था झाल्याचे कारण नेत्यांना शोधावे लागणार आहे.
राष्ट्रवादी संपली
मागील निवडणुकीत नऊ जागा मिळवणारा, यावेळी समाजवादी पक्षासोबत जाऊन दुसऱ्या क्रमांकावर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला भोपळा त्या पक्षाची अवस्था स्पष्ट करणारा आहे. कपिल पाटील यांनी भाजपात जाताना हा पक्ष फोडला होता. त्यानंतर तो सावरला असा दावा केला जात होता. पण वरिष्ठ नेत्यांनी संघटनात्मक बांधणीकडे केलेले दुर्लक्ष पक्षाला भोवले. खुद्द अजित पवार यांनीच प्रचाराला दांडी मारल्याची चर्चा झाली.

१भिवंडीच्या बकालीकरणाला कोणार्क विकास आघाडी जबाबदार असल्याचा संदेश शहरभर पसरत असताना त्याच आघाडीला सोबत घेत केलेला समझोता आणि पुरेसा प्रभाव नसलेल्यांना दिलेली संधी, एका व्यक्तीच्या मर्जीवर केलेले राजकारण यामुळेच भिवंडीत सत्ता स्थापन करण्याचे भाजपाचे प्रयत्न अयपशी ठरले.
२भाजपाने कोणार्क विकास आघाडीशी हातमिळवणी करून लढवलेल्या जागांना धोका झालाच, त्याचबरोबर भाजपाने स्वतंत्रपणे दिलेल्या उमेदवारांनाही कमी प्रतिसाद मिळाला. भाजपाच्या विद्यमान आठ नगरसेवकांनी आपल्या पॅनलमध्ये यश मिळविले. त्यांच्यासोबत नवे चेहरे देण्यात भाजपा अपयशी ठरली.
३मेट्रो, यंत्रमागांचे पॅकेज, मुख्यमंत्र्याची सभा यातील कशाचाच परिणाम मतदारांवर झाला नाही. पद्मानगरमध्ये पॅनल निवडून आणण्यासाठी खासदारांना तळ ठोकावा लागला. शिवसेनेतून भाजपात आलेल्या वासुआण्णा नाडार यांनाही शिवसेनेच्या सुनील पाटील यांच्याशी दोन हात करावे लागले.
४कामतघर येथील भाजपा गटनेता नीलेश चौधरी यांनाही उत्तरभारतीयांची मते मिळविण्यासाठी अभिनेता मनोज तिवारी यांना आणावे लागले, तर कोणार्क आघाडीच्या पॅनलमधून प्रभाग सहामध्ये उभ्या राहिलेल्या भाजपाच्या उमेदवारांना मतदारांनी घरी पाठविले.

Web Title: The danger hour for the BJP-Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.