‘एनआरसी’ची ५० मीटर उंचीची धोकादायक चिमणी जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:56+5:302021-03-27T04:41:56+5:30
कल्याण : आंबिवली, मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कंपाऊंडमधील ५० मीटर उंचीची धोकादायक चिमणी शुक्रवारी सर्व सुरक्षिततेच्या उपाययोजना आखून पाडण्यात ...
कल्याण : आंबिवली, मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कंपाऊंडमधील ५० मीटर उंचीची धोकादायक चिमणी शुक्रवारी सर्व सुरक्षिततेच्या उपाययोजना आखून पाडण्यात आली.
एनआरसी कंपनीचे बांधकाम सुरू झाले, त्यावेळी १९५० मध्ये आरसीसी बांधकाम असलेली ही चिमणी बांधण्यात आली होती. २००९ मध्ये कंपनी बंद पडली. तेव्हापासून ही चिमणी धोकादायक झाली होती. ही चिमणी धोकादायक झाल्याने ती पाडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका व पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या. एनआरसी कंपनीची जागा लिलावात अदानी समूहाने घेतली आहे. तेथे जागतिक दर्जाचा, अत्याधुनिक स्वरूपाचा भव्य लॉजिस्टीक पार्क उभारला जाणार आहे. लॉजिस्टीक पार्कच्या प्रकल्पाचा मास्टर प्लान तयार करण्यासाठी रेल्वे आणि महापालिकेशी अदानी समूहाची चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे, अदानी समूहाकडून कंपनीच्या आवारात पाडकाम सुरू आहे. समूहाच्या टीमने कंपनीची चिमणी पोलीस, महापालिका आणि महावितरण कंपनी यांच्या सहकार्याने शुक्रवारी टिटवाळा-आंबिवली रस्ता बंद करून पाडली. कंपनीच्या आवारात अन्य दोन आरसीसी तसेच चार स्टीलच्या चिमण्या आहेत. त्यादेखील लवकरच पाडण्यात येणार आहेत.
-----------------