भिवंडीतील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील धोकादायक इमारत कोसळली, सुदैवाने जिवीतहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:47 PM2018-07-11T13:47:38+5:302018-07-11T13:49:58+5:30
भिवंडी: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील दोन मजली इमारत काल रात्री दरम्यान कोसळली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या घटनेने ग्रामिण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यालगत कारीवली ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या संख्येने अनाधिकृत बांधकाम झाले असून अनेक बांधकामे निकृष्ट दर्जाच्या बनलेली आहेत. भिवंडी-वसई रोडवरील बहात्तर गाळ्याजवळ जे.व्ही.सी. कंपाऊण्ड येथील प्रियांका कॉम्प्लेक्स या निकृष्ट बांधकाम असलेल्या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील कामगारांना काल मंगळवार रोजी सकाळपासून भिंतीवरील प्लास्टर सुटून माती पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी आपल्या कारखाना मालकांना सांगून ते इमारतीतील गोदाम व कारखान्याच्या इमारतीबाहेर पडले. ही इमारत रेवाभाई मेहता या विकासकाने बनवून त्यामधील व्यावसायीक व गोदामांची विक्री केली,अशी माहिती सिध्देश शहा या कारखानदाराने दिली. इमारत कमकुवत झाल्याची तक्रार गाळेधारक व व्यावसाईक यांनी विकासकडे करूनही त्यांनी दखल घेतली नाही. गेली चार दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने काल मंगळवारी दिवसभर पाणी व माती इमारतीमध्ये पडू लागले होती. त्यामुळे सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारतीतील व्यावसायीकांनी काल रात्री भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीसांनी सुरू असलेल्या पावसात कमकुवत झालेल्या इमारतीची पहाणी केली असता त्यांच्या समोर इमारतीचा काही भाग ढासळला. या घटनेची माहिती पोलीसांनी पालिकेच्या आपत्कालीन विभाग व आग्निशामक दलास माहिती दिली. दरम्यान इमारतीचा बरासचा भाग सुरू असलेल्या पावसामुळे काल रात्रीदरम्यान कोसळला असून कोणतीही प्राणहानी झाली नाही. सदर इमारतीच्या कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसून इमारतीचा उरलेले धोकादायक बांधकाम आपत्ती व्यवस्थापनाकडून तोडला जाणार आहे,अशी माहिती कारखानदारांनी दिली.