धोकादायक इमारत कोसळली, रहिवाशांमध्ये पसरली घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 01:09 AM2019-07-19T01:09:13+5:302019-07-19T01:09:20+5:30

शहरातील इस्लामपुरा या भागात एक मजली जुनी धोकादायक इमारत गुरुवारी दुपारी अचानक कोसळली.

Dangerous building collapses, panic spreading among the residents | धोकादायक इमारत कोसळली, रहिवाशांमध्ये पसरली घबराट

धोकादायक इमारत कोसळली, रहिवाशांमध्ये पसरली घबराट

Next

भिवंडी : शहरातील इस्लामपुरा या भागात एक मजली जुनी धोकादायक इमारत गुरुवारी दुपारी अचानक कोसळली. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. यात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी शहरातील पाचही प्रभागांतर्गत असलेल्या बेकायदा व धोकादायक इमारतींची माहिती प्रभाग अधिकाऱ्यांकडून तातडीने मागवली आहे. असे असतानाच महापालिका प्रशासकीय कार्यालयाजवळ असलेल्या इस्लामपुरा येथे शकिना हाजी इन्सानबी मियाजी यांच्या मालकीची ही धोकादायक एक मजली इमारत दुपारी २ च्या सुमारास अचानक कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये १३ भाडेकरू राहत होते. मात्र, इमारत मोडकळीस आल्याने काही कुटुंबे घर बंद करून इतरत्र राहण्यासाठी निघून गेली होती.
सफी अन्सारी हा आपल्या कुटुंबासह याच इमारतीत राहत होता. इमारतीचे स्लॅब कोसळत असल्याचे त्याच्या नजरेस पडताच सफी हा आपल्या कुटुंबासह बाहेर पडला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत विस्थापित झालेल्या कुटुंबांची पालिकेच्या शाळेत तात्पुरती राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे, अशी माहिती प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांनी दिली.
दरम्यान, पालिका उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. भिवंडी महापालिका क्षेत्रात पाच वर्षांपासून धोकादायक इमारतींची संख्या बेसुमार वाढली आहे. सुमारे ९७८ धोकादायक इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. या इमारतींमध्ये दोन हजार ४६० कुटुंबे राहत असून १५ हजार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
>इमारतींच्या घटनांमध्ये २२ मृत्युमुखी
दोन वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनांत २२ जणांचा मृत्यू, तर ३० जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिका क्षेत्रात वारंवार होणाºया इमारत दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने तत्काळ उपाययोजना हाती घ्यावी, अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रि या भिवंडी महापालिकेतील भाजपचे गटनेते निलेश चौधरी यांनी दिली आहे.

Web Title: Dangerous building collapses, panic spreading among the residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.