कचोरेतील धोकादायक दवाखान्याचे पाडकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 01:38 AM2020-06-20T01:38:29+5:302020-06-20T01:38:32+5:30

केडीएमसीची कार्यवाही : नवीन बांधकामालाही लवकरच सुरुवात

Dangerous dispensary in Kachora is under construction | कचोरेतील धोकादायक दवाखान्याचे पाडकाम सुरू

कचोरेतील धोकादायक दवाखान्याचे पाडकाम सुरू

Next

कल्याण : कचोरे येथील हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहतीमधील दवाखान्याच्या जीर्ण झालेल्या वास्तूच्या पाडकामाला अखेर सुरुवात झाली आहे. एक वर्षाहून अधिक काळ लोटूनही वापराविना खितपत पडलेली ही वास्तू धोकादायक अवस्थेत जैसे थे उभी होती. त्यामुळे या वास्तूचा भाग कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात बातमी प्रसिद्ध करताच जागे झालेल्या प्रशासनाने शुक्रवारी ही वास्तू तोडण्याची कार्यवाही सुरू केली.

कुष्ठरुग्णांसाठी केडीएमसीने १९९३ मध्ये येथे एक स्वतंत्र दवाखाना उभारला होता. गेली २५ वर्षे तेथे रुग्णांवर उपचार सुरू होते. परंतु, या दवाखान्याच्या जीर्ण अवस्थेमुळे त्याची पडझड झाली होती. अतिधोकादायक अवस्थेतील या दवाखान्याचा स्लॅब कधीही कोसळून रुग्णांना तसेच परिसरातून येजा करणाऱ्या स्थानिकांना दुखापत होण्याची शक्यता होती. त्यामुळे फेब्रुवारी २०१९ पासून हा दवाखाना शेजारील केडीएमसीच्या शाळेलगत असलेल्या सभागृहात स्थलांतरित केला होता.

मात्र, जुना दवाखान्याची वास्तू कधी बांधणार असा, सवाल केला जात होता. महापालिकेचे या वास्तूकडे झालेले दुर्लक्ष पाहता ‘लोकमत’ने गुरुवारी ‘दुरुस्तीअभावी दवाखान्याची धोकादायक वास्तू जैसे थे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.
त्याची दखल घेत केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग कार्यालयाने शुक्रवारपासून या वास्तूचे पाडकाम सुरू केले आहे.

लोकमतचे आभार
कुष्ठरुग्णांसाठी नवीन दवाखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या कामाचे भूमिपूजन महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत ३० जानेवारी २०२० ला करण्यात आले.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात या कामासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, अद्याप नव्या बांधकामाचीही एक वीट रचली गेलेली नाही, याकडेही ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते.

हे बांधकामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती हनुमाननगर कुष्ठपीडित संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी दिली. कुष्ठपीडितांच्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल गायकवाड यांनी ‘लोकमत’चेही आभार मानले.

Web Title: Dangerous dispensary in Kachora is under construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.