धोकादायक भाग कोसळला
By admin | Published: July 2, 2017 06:04 AM2017-07-02T06:04:39+5:302017-07-02T06:04:39+5:30
ग्रामपंचायतीने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात कोसळला. अशा स्थितीत
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : ग्रामपंचायतीने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात कोसळला. अशा स्थितीत उरलेल्या इमारतीच्या काही भागात दोन कुटुंबे राहत आहेत.
शहराजवळ खाडीपार-खोणी ग्रामपंचायत हद्दीत एकता चौकामध्ये आरफात शेख यांच्या मालकीची दोन मजली इमारत आहे. या इमारतीस ग्रामपंचायतीने धोकादायक जाहीर करूनही मालकाने ती पाडली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इमारतीला धोका निर्माण झाला होता. शुक्रवारी रात्रीच्या वेळी इमारतीत पाणी घुसून पहिल्या मजल्यावरील काही भाग व भिंत अचानक कोसळली. रात्रीच्या वेळी इमारतीच्या तळमजल्यावरील दुकाने बंद असल्याने जीवितहानी टळली. इमारतीत पागडीने राहत असलेल्या दोन कुटुंबांची पर्यायी व्यवस्था केली. परंतु, दुसऱ्या मजल्यावरील दोन कुटुंबांनी अद्याप आपल्या खोल्या सोडलेल्या नाहीत. धोकादायक इमारत असूनही इमारतीत वीजपुरवठा सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. या दुर्घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलाने अथवा संबंधित पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना तसेच ग्रामीण आपत्ती व्यवस्थापनास न दिल्याने महसूल विभागाला तीन तासांनी माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.
भिवंडीतील धोकादायक इमारतींचा विषय दरवर्षी पावसाळ््यात समोर येतो आणि नंतर त्यावर काहीही कारवाई होत नाही. गेल्यावर्षीही दोन इमारती कोसळल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला होता.
यंदा मे महिन्यातच राज्य सरकराने अशा इमारतींची वर्गवारी करून त्या तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेतून समोर आले. मालकाने ही इमारत न तोडल्याने आणि त्यासाठी पंचायतीने त्याच्याकडे आग्रह न धरल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली. पण त्यातून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही समोर आला आहे.