रेल्वेसाठी धोकादायक असलेल्या ‘त्या’ नाल्याचे काम पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:26 AM2018-04-09T02:26:10+5:302018-04-09T02:26:10+5:30
पावसाळ्यात रेल्वेरूळ खचण्याची भीती असल्याने चिखलोलीतील नाल्याचे काम रविवारी मेगाब्लॉक घेऊन रेल्वेने पूर्ण केले.
बदलापूर : पावसाळ्यात रेल्वेरूळ खचण्याची भीती असल्याने चिखलोलीतील नाल्याचे काम रविवारी मेगाब्लॉक घेऊन रेल्वेने पूर्ण केले. या काळात जवळपास सहा तास वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
अंबरनाथ ते बदलापूरदरम्यान रेल्वे रुळाची दुरुस्ती, चिखलोली येथे रूळांखालील नाल्याचे काम, विठ्ठलवाडी-उल्हासनगरदरम्यान अन्य कामे करण्यासाठी कल्याण ते बदलापूरदरम्यानची वाहतूक या काळात पूर्ण बंद होती. चिखलोली गावाजवळ रेल्वे रुळाखालून जुना नाला गेला होता. तो अरूंध असल्याने पावसाळ्यात पाणी वाहून नेण्यास तो अपुरा ठरत होता. त्यामुळे रेल्वे रुळाच्या शेजारी पाणी साठून रहात होते. त्यामुळे भविष्यात रेल्वे रुळ खचण्याची, प्रसंगी मार्ग वाहून जाण्याची भीती असल्याने रेल्वे प्रशासनाने हा नाला मोठा करण्याचे काम हाती घेतले होते. नाल्याचे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून आधीच मोठे आरसीसी ब्लॉक तयार केले होते. रूळांखाली खोदकाम करून ते ब्लॉक टाकणे, नंतर माती टाकून ती जागा पूर्ववत करणे आणि रूळ टाकून मार्ग तयार करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हे काम सकाळी १० वाजता सुरु करण्यात आले. नाल्याच्या कामामुळे येथे यंदाच्या पावसाळ््यात पाणी तुंबणार नाही.
रेल्वे रुळाखाली नाला तयार करण्याचा प्रयत्न गेल्यावर्षी सप्टेंबरमध्येही करण्यात आला. मात्र, पावसाचे दिवस असल्याने, माती खचत असल्याने तेथे महाकाय क्रेन नेणे आणि खड्डा खणून नाल्याचे ब्लॉक बसवणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने हे काम एप्रिल महिन्यात करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
>आठवडाभर वाहतूक धीमीच : चिखलोलीच्या नाल्याचे काम झाले असले तरी तेथून जाणाºया गाड्यांना किमान आठवडाभर तरी वेगाची मर्यादा पाळावी लागेल. त्यामुळे कर्जत मार्गावरील लोकलच्या वाहतुकीला या काळात विलंब होण्याची शक्यता आहे.