ढाब्यात नाग शिरल्याने उडाली ग्राहकांची घाबरगुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:55 AM2018-03-05T02:55:30+5:302018-03-05T02:55:30+5:30
भिवंडी : मित्रमंडळीचे वाढदिवस असो की कुटूंबातील सदस्यांचा मुड असो हल्ली रस्त्यालगत झालेल्या मोकळ्या-ढाकळ्या ढाब्यावर रात्रीच्या वेळी खवय्यांची रिघ लागलेली दिसत आहे. गेल्या काही वर्षात ढाबा संस्कृतीने खवय्यांना आकर्षीत केल्याने रात्रीच्या मोकळ्या आभाळाखाली मोठमोठ्या जेवणावळी सुरू असतात.अशीच एक पार्टी रंगात आली असताना पार्टीतील सदस्याने ढाब्याच्या आवारात शिरलेला नाग पाहिल्यानंतर त्याची घाबरगुंडी उडाली अन् तो सा..प साप.. साप..ओरडत जेवण तेथेच टाकून ढाब्याच्या बाहेर पळाला. त्याच्या पाठोपाठ ढाब्यातील इतर ग्राहकांनी देखील ढाब्याबाहेर धूम ठोकून आपला जीव वाचविल्याची घटना तालुक्यातील भिवंडी-कल्याण मार्गावरील बापगाव परिसरातील ढाब्यावर घडली. या घटनेचा मुंबई-नाशिक व भिवंडी -नाशिक मार्गावरील धाबा मालकांनी धसका घेतला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमुख रस्त्यावर ढाबा संस्कृतीला पेव फुटले आहे. या ठिकाणी गावठी चिकन, मासे, मटणावर ताव मारण्यासाठी अनेक खवय्ये रात्रीच्या सुमाराला जास्त प्रमाणात गर्दी करतात. त्याप्रमाणे भिवंडी तालुक्यातील भिवंडी-कल्याण मार्गावर बापगाव परिसरातील जगदंबा ढाब्यावर रात्री १२ च्या सुमारास काही तरु णमंडळी जेवणाचा बेत आखून ढाब्यावर गेले. तेथे गप्पांचे फड रंगून जेवण करताना एका तरु णास ढाब्यात नाग शिरत असताना पाहिला.त्याने जोरात सापाच्या नावाने बोंबा मारून जेवणाच्या ताटावरून पळ काढला. हे पाहून इतरही ग्राहकांनी ढाब्याबाहेर धूम ठोकली.त्यानंतर ढाबा मालकाने सर्पमित्रांना फोन करून ढाब्यात बोलाविले व नाग शिरल्याची माहिती दिली. काही वेळातच कल्याणचे सर्पमित्र दत्ता बोंबे याने ढाब्यावर येऊन ढाब्यात लपलेल्या नागाला काही मिनिटांतच पकडले.त्याने ४ फुट असलेल्या नागाला कापडाच्या पिशवीत टाकून दुसºया दिवशी वन विभागाची परवानगी घेऊन जंगलात सोडणार असल्याचे ढाबा मालकास व लोकांना सांगीतले.मात्र या घटनेने ढाबा मालकांसह मोकळ्या आभाळाचा आनंद घेणारे ग्राहक देखील धास्तावले आहेत.