अनधिकृत जाहिरातफलकांमुळे प्रवेशद्वारांच्या कमानी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:15 AM2019-11-16T01:15:05+5:302019-11-16T01:15:09+5:30
शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या धोकादायक झालेल्या कमानी तोडण्यासाठी अखेर एका कंत्राटदाराने तयारी दर्शविली आहे.
ठाणे : शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या धोकादायक झालेल्या कमानी तोडण्यासाठी अखेर एका कंत्राटदाराने तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर लगेच त्या तोडण्याच्या कामाला सुरु वात करणार असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.
शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या कमानींवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे जाहिरातफलकांमुळे धोकादायक झाल्याने त्या तोडण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या कमानींमध्ये मुलुंड-ठाण्यामधील मॉडेला चेकनाका, आनंदनगर आणि विटावा येथील प्रवेशद्वारांच्या कमानी तोडण्यात येणार आहेत. त्या तोडण्यासाठी कंत्राटदारांच्या नियुक्तीचे काम महापालिकेच्या वतीने सुरू होते. मात्र, निविदेला तीन वेळा मुदतवाढ देऊनही कोणीही कंत्राटदार हे काम करायला तयार नव्हते. अखेर, पाच महिन्यांनी एक कंत्राटदार ते करण्यासाठी तयार झाला असून महासभेत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच या तोडकामाला सुरु वात होणार आहे. या कमानी धोकादायक झाल्या असून काही ठिकाणांचे प्लास्टर पडत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याठिकाणी संरक्षक जाळ्याही बसविल्या आहेत. परंतु, कमानीच्या साहित्याचे वजन अधिक असल्याने ते महामार्गावरील भरधाव गाड्यांवर पडण्याची शक्यता आहे. तात्पुरती व्यवस्था केली असली, तरी त्यांचा धोका कायम आहे. त्यामुळे त्या तत्काळ तोडण्याची मागणी स्थानिकांकडून केली आहे.
आॅगस्ट २०१८ मध्ये एलबीएस मार्गावरील मुलुंड-ठाण्यातील मॉडेला चेकनाका परिसरातील कमानीचा काही भाग कोसळण्यास सुरु वात झाली होती. या कमानीखालून जाणाऱ्या एका गाडीवर प्लास्टरचा काही भाग पडला होता.
यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी यानिमित्ताने धोकादायक कमानींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्यांची दुरु स्ती करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या कमानींची पाहणी करून त्या तोडण्याचे निश्चित केले होते.
>या कमानी तोडल्यानंतर त्या पुन्हा बांधायच्या की नाही, याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. महामार्गावरील वाहनचालकांना या धोकादायक कमानींपासून नुकसान होऊ नये, यासाठी सर्वात आधी त्या हटवण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जो कंत्राटदार कमानी तोडेल, त्याने पालिकेला काही मोबदला द्यायचा असून कमानीचे मटेरियल विकून त्याचा फायदा संबंधित ठेकेदाराला मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.