शहापूरचे दापूर गाव महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे महिन्यांपासून अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 15:03 IST2021-08-21T14:47:44+5:302021-08-21T15:03:36+5:30
Shahapur News : महावितरण विभागाची हलगर्जी व निष्काळजी कारणीभूत असल्याचा आरोप त्रस्त गावकऱ्यांकडून केला जात आहे.

शहापूरचे दापूर गाव महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे महिन्यांपासून अंधारात
ठाणे - शहापूर तालुक्यातील दापूर गावाला वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र (डेपो) झाल्यामुळे येथील गावकरी एक महीन्यापासून अंधारात आहे. याला महावितरण विभागाची हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्रस्त गावकऱ्यांकडून केला जात आहे. जंगल, दऱ्याखोऱ्यातील या गावातील रहिवाशांना साप, विंचू, किडे आदी जीव घेणाऱ्या सरपटणाऱ्या जनावरांच्या भीतीने येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन या पावसात वावरत आहेत. सततच्या पावसाने बियांमध्ये पाणी शिरल्याने सरपटणारे प्राणी गावाकडे, घरांच्या आसऱ्याला, कोरड्या जागेच्या शोधात या परिसरात वावरत आहेत. गवतात, झाडाझुडुपांमध्ये ते सरपटताना दिसत आहे.
रात्री अंधारात दंश करून ते जीव घेण्याची भीती या गावकऱ्यांना सतावत आहे. महिन्यापासून अंधारात चाचपडत असलेल्या या गावकऱ्यांनी महावितरणच्या खर्डी येथील कार्यालयात कैफियत मांडून, पाठपुरावा करुनही वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याची खंत येथील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. येथील ७५ घरांमधील लहानथोर मिळून एक हजार लोकसंख्येच्या या गावाला एक महिन्यापासून अंधारात राहावं लागत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण गाव अंधारात असल्याने येथील शेतकरी, कष्टकरी, महिला, लहान मुले आदींना जीव घेण्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या वीज मंडळाच्या खर्डी कार्यलयाला वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नाही. या दापूर गांवाला वीज पुरवठ्या अभावी अंधाराबरोबर विविध समस्यांशी संघर्ष करावा लागत आहे.
वीजे अभावी गिरण्या बंद आहेत. त्यामुळे ज्वारी, बाजरी, तांदूळ देण्यासाठी अन्य गावांमध्ये, खर्डीला पायपीट करावी लागत आहे. मोबाईल चार्ज नसल्याने रात्री बेरात्री, संकटकाळी संपर्क करणे शक्य नाही. यावर वेळीच लक्ष केंद्रीत करण्यासाठी खर्डी घ्या वीज कार्यालयाचे लक्ष वेधले आहे. मात्र अजूनही त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला नसल्याची खंत येथील संतोष शिगवा, गणेश वाघ यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. या वीज पुरवठ्या अभावी उद्भवणाऱ्या संकटास महावितरणला जबाबदार धरण्याचा इशारा या त्रस्त गावकऱ्याकडून दिला जात आहे.