‘ते’ दरोडेखोर १६ डिसेंबरला करणार होते भाजपचे नगरसेवक कुणाल पाटील यांची हत्या
By जितेंद्र कालेकर | Published: December 22, 2017 06:14 PM2017-12-22T18:14:39+5:302017-12-22T23:54:13+5:30
नगरसेवक महेश पाटील यांच्या इशा-यानुसार १६ डिसेंबर रोजी भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या खूनाची तयारी झाली होती. तत्पूर्वीच ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सहा दरोडेखोरांना जेरबंद केले.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अखेर डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्याची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचेच नगरसेवक महेश पाटील यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भिवंडीच्या कुडूस येथील एका दरोड्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांचे पथक करीत असतांना त्यांनी १३ डिसेंबरला भिवंडीतून कैलास घोडविंदे, राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, विजय मेनबन्सी आदी सहा जणांना अटक केली. त्यांनी आधी गणेशपुरी भागातील दोन तर वाडा (जिल्हा पालघर) येथील एक अशा तीन दरोडयांची कबूली दिली. या तिन्ही ठिकाणी त्यांनी गोळीबार करुन लाखोंची रोकड लुटली होती. त्यांच्यातील विजय मेनबन्सी याने दिलेल्या माहितीतून कुणाल पाटील यांना भाजपचेच नगरसेवक महेश पाटील यांनी ठार मारण्याची सुपारी दिल्याचेही त्यांनी सांगितले. ५० लाखांच्या या ‘सुपारी’ पैकी १० लाख रुपये रोकड घेतल्याचेही त्यांनी सांगितले. ही माहिती उघड होताच तपास अधिकाºयांनाही धक्का बसला. महेश यांनीही २०१५ मध्ये कुणाल यांना ठार मारण्याची सुपारी दिली होती, असा आरोप आहे. या आरोपाखाली त्यांना अटकही झाली होती. या आणि अन्यही कारणांवरुन दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वैमनस्य आहे. आरोपींनी महेश पाटील यांचे नाव घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना दिले होते. त्यानुसार याचीखातरजमा झाल्यानंतर गणेशपुरीचे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव आणि एलसीबीचे व्यंकट आंधळे यांनी याप्रकरणी महेश पाटील, सुजित नलावडे, विजय मेनबन्सी यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा केला आहे. .................
पकडले गेल्यामुळे जीव बचावला...
यापूर्वी कुणाल या हल्ल्यातून बचावले असल्यामुळे त्यांना पुन्हा १६ डिसेंबर रोजी मारण्याचे ठरले. विजयसह सहा जणांना पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याचे बोलले जात आहे.