‘दिव्या’ खालचा अंधार आता होणार दूर
By admin | Published: March 15, 2017 02:31 AM2017-03-15T02:31:17+5:302017-03-15T02:31:17+5:30
निवडणुकीपूर्वी दिव्याचा विकास करण्याचे वचन सत्ताधारी शिवसेनेने दिले होते. त्यानुसार सत्ता येताच, पहिल्याच महासभेत दिव्याच्या विकासाचा भरगच्च असा प्रस्ताव पालिकेने पुढे
ठाणे : निवडणुकीपूर्वी दिव्याचा विकास करण्याचे वचन सत्ताधारी शिवसेनेने दिले होते. त्यानुसार सत्ता येताच, पहिल्याच महासभेत दिव्याच्या विकासाचा भरगच्च असा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला आहे. यामध्ये पोलीस स्टेशन, बस स्टँड, मार्केट, जलकुंभ व इएसआर, प्रभाग कार्यालय, हॉस्पीटल, १५ मीटर रुंद रस्ता, पार्किंग आणि अग्निशमन केंद्राचा समावेश आहे. रेल्वेने आगासन येथील सेक्टर १० मधील १३.८७ हेक्टरचे आरक्षण संपादीत न केल्याने पालिकेने अखेर त्या ठिकाणी दिव्याच्या विकासाचा नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव २० मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस दिव्यातील वाढणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येवर नजरा ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी दिव्यासाठी विकासगंगा आणण्याचा निर्णय घेतला होता. सत्ताधारी शिवसेनेनेदेखील दिव्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे वचन दिले होते. त्यानुसार नव्या महापौरांच्या पहिल्याच महासभेत हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवल्याने दिव्यात आता विकासाची गंगा वाहणार हे नक्की झाले आहे.
या संदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव पटलावर ठेवला असून यापूर्वीच यासाठी आवश्यक हरकती व सुचना मागविल्याची माहिती पालिकेने दिली. आता महासभेत याला मंजुरी मिळाल्यास दिव्याचा विकास निश्चित आहे. (प्रतिनिधी)
कळव्यातील पर्यायी रस्ता एमएमआरडीएकडे
ठाणे : कळवा खाडीवर आणखी एका पुलाचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे कळव्यापासून पुढे खारेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर भविष्यात कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील आत्माराम चौकापासून आतील बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्याची जबाबदारी आता एमएमआरडीएने उचलली असून यासाठी ३५० कोटींचा खर्च करुन ९० फुट रुंद रस्ता उभारण्यात येणार आहे.
मंगळवारी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी या भागाची पाहणी केली. रस्त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्यानंतर त्यांनी मंजुरी दिल्यानंतर तातडीने कामाला सुरूवात केली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या रस्त्यामुळे कळवा ते रेतींबदर हा विद्यमान रस्ता वाहतूककोंडीमुक्त होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड हे या पर्यायी रस्त्यासाठी मागील सात वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत. परंतु, पालिका अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे हा रस्ता अद्यापही मार्गी लागू शकलेला नाही. दरम्यान मंगळवारी दराडे आणि अन्य अधिकारी खारेगाव येथील प्रस्तावीत सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टच्या जागेची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी भिवंडी बायपास आणि कळव्याहून रेतीबंदरला जाणाऱ्या जुन्या रस्त्यादरम्यानच्या या प्रस्तावीत रस्त्याबाबतची माहिती आव्हाड यांनी त्यांना दिली. त्यानंतर दराडे यांनी या भागाचीसुद्धा पाहणी केली असून त्या रस्त्याची गरज लक्षात आल्यानंतर एमएमआरडीएच्या माध्यमातून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्राथमिक तयारीही दर्शविली. सध्या येथे अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण अशक्य असल्याने पर्यायी रस्त्याशिवाय पर्याय नसल्याचे आव्हाड यांनी दराडे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सध्या वेगाने खाडीवर नवीन पुलाचे कामही होत असल्याने पुढील रस्ता अरुंद असल्याने या भागात वाहतूककोंडी होऊ शकणार असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे हा पर्यायी रस्ता केवळ जुना कळवा रस्ताच नव्हे तर भिवंडी बायपासहून ये- जा करणारी अनेक वाहनेसुद्धा या मार्गाचा वापर करू शकतील, असा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. हा पर्यायी रस्ता सुमारे अडीच ते तीन किमी अंतराचा आहे. (प्रतिनिधी)