कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:08+5:302021-05-28T04:29:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या वर्षभरापासून ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, यातून जिल्ह्यातील अंध व्यक्तीदेखील सुटू ...

Darkness in front of blind people due to corona | कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार

कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेल्या वर्षभरापासून ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, यातून जिल्ह्यातील अंध व्यक्तीदेखील सुटू शकलेल्या नाहीत. जिल्ह्यातील सुमारे २५ अंधांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे, तर त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे; परंतु कोरोनाच्या काळात रुग्णालयातील अनुभवापेक्षा घरच्यांनी ज्या पद्धतीने साथ दिली, त्यामुळे आपण कोरोनावर मात केल्याचे हे अंध बांधव सांगत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या काळात कुटुंबच आपल्यासाठी खरा आधार ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसऱ्या लाटेतही जिल्ह्यातील अंध व्यक्तींनाही कोरोनाने आपल्याकडे खेचल्याचे दिसून आले. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २५ अंधांना कोरोनाची लागण झाली असून, यातील दोघांचा यामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती अंध व्यक्तींच्या बाबतीत काम करणाऱ्या संस्थेने दिली आहे; परंतु शासकीय पातळीवर कोरोना रुग्णांची एकत्रित आकडेवारी उपलब्ध असून, त्यांनी अंध, अपंग आदींची आकडेवारी वेगळी केलेली नसल्याची माहितीदेखील समोर आली आहे. असे असले तरी अंध व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी त्यांना काय हवे काय नको, हे पाहणेदेखील महत्त्वाचे होते. अशा रुग्णांवर उपचार करताना त्यांना हाताजवळ काय काय देता येईल, याची काळजी मात्र रुग्णालयांकडून घेण्यात येत होती; परंतु काही रुग्णांना शासकीय रुग्णालयांचादेखील काहीसा वाईट अनुभव आल्याचे दिसून आले आहे. डोंबिवलीतील एका अंध व्यक्तीला कोरोनाची बाधी झाली होती. मागील सप्टेंबर महिन्यात तो रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. तो शासकीय सेवेत कामाला आहे; परंतु रेल्वेसेवा जेव्हा सुरू झाली, त्यानंतर तो अवघ्या १० व्या दिवशी पॉझिटिव्ह आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे काम त्याच्या पत्नीनेच केले. शासकीय रुग्णालयात तो दाखल होता; परंतु त्याठिकाणी उपचारासाठी होणारा विलंब, आयसीयुमध्येदेखील त्याला वाईट अनुभव आले. अखेर ११ व्या दिवशी या रुग्णाने डॉक्टरांना सांगून स्वत: डिस्चार्ज घेतला. त्यानंतर घरीच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून घेऊन कुटुंबीयांच्या मदतीने त्याने कोरोनावर मात केली. या कठीण काळात त्याला साथ देता देता, त्याची पत्नी, आई आणि मोठ्या मुलालादेखील कोरोनाची लागण झाली होती; परंतु या सर्वांनी कोरोनावर मात केली.

अशीच काही उदाहरणे समोर आली असून, कोरोनाच्या पहिल्या लाटेत एखाद्याला कोरोना झाला तर त्याला त्यांच्या शेजारीदेखील वाळीत टाकायचे, असा अनुभव होता, त्यात अशा अंधांना कोरोना झाला तर त्यांच्या मदतीसाठी मात्र काहींनी मदतीचा हात पुढे केला; परंतु या कठीण काळात कुटुंबीयांच्या मिळालेल्या साथीमुळेच आपण कोरोनावर मात केल्याचे हे अंध बांधव सांगत आहेत.

अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या ठाणे पूर्व येथील सारथी रिसोर्स-स्टडी सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज या संस्थेचे प्रतिनिधी जयंत गोगटे यांच्या माध्यमातूनदेखील ८३ अंध बांधवांचे समुपदेशन केले जात आहे. या कोरोनाच्या या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे, हात धुणे, कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ खाऊ नये, कोरोना काळात तब्बेतीची कशी काळजी घ्यावी, या विषयीचे मार्गदर्शन केले जात आहे. तर डोंबिवलीतील व्हिजन इनसाईट फाउंडेशनचे प्रमुख हेमंत पाटील यांच्या माध्यमातून मागील ४० वर्षांपासून अंध व्यक्तींसाठी काम केले जात आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना काळात काय काय उपाय योजना कराव्यात, याचे मार्गदर्शन या फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे, तसेच त्यांनीदेखील अंध व्यक्तींना कशा पद्धतीने वाईट समस्यांना सामोरे जावे लागले, याची माहिती दिली.

सप्टेंबर महिन्यात मला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मी शासकीय कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल झालो. ११ दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो; परंतु अनुभव फार वाईट आला, त्यामुळे नाइलाजास्तव मी स्वत:हून डिस्चार्ज घेऊन घरी आलो. घरीच ऑक्सिजन मागवून कुटुंबीयांच्या मदतीने मी कोरोनावर मात केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने या काळात मला कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली.

(दिगंबर चौधरी )

........

मागील ४० वर्षे मी फाउंडेशनच्या माध्यमातून अंध व्यक्तींसाठी काम करीत आहे; परंतु कोरोनाच्या काळात ज्या ज्या अंध व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना फारसे चांगले अनुभव आले नाहीत; परंतु त्यांच्या कुटुंबीयांनीच त्यांना साथ दिल्याने त्यांनी कोरोनावर मात केल्याचेच दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीत कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, याचे मार्गदर्शन आम्ही करीत असतो.

(हेमंत पाटील - व्हिजन इनसाईट फाउंडेशन )

२०१७ पासून आम्ही अंध विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहोत. त्यांना विविध पद्धतीचे मार्गदर्शन करीत आहोत. कोरोनाकाळात आता त्यांनी फोनवरून संपर्क साधून त्यांना योगासन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे आदींसह इतर महत्त्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन करीत आहोत. यासाठी आमची टीमदेखील काम करीत आहे.

(जंयत गोगटे - सारथी रिसोर्स - स्टडी सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज )

Web Title: Darkness in front of blind people due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.