शौर्यगाथा सांगणारा मांडवी किल्ला बनला दारूचा अड्डा
By admin | Published: October 16, 2015 01:49 AM2015-10-16T01:49:05+5:302015-10-16T01:49:05+5:30
वसई पूर्वेकडे चिमाजी आप्पांची शौर्यगाथा सांगणारा ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला किल्ले मांडवी कोट. गडकोटाच्या माहितीपटावर हा किल्ला नामशेष झाला
सुनील घरत, पारोळ
वसई पूर्वेकडे चिमाजी आप्पांची शौर्यगाथा सांगणारा ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला किल्ले मांडवी कोट. गडकोटाच्या माहितीपटावर हा किल्ला नामशेष झाला असून तो ऐतिहासिक वारसा समाजाच्या विस्मृतीत गेला आहे. आज त्याचा वापर चक्क शौचालयासारखा तसेच दारू पिण्यासाठी निवांत जागा म्हणून केला जातो.
वसई तालुक्यातील गडकोटांच्या यादीत मांडवी किल्ल्याचे महत्त्वाचे स्थान आहे. पुस्तकांत मांडवी किल्ला नामशेष झाला, असा उल्लेख आढळतो. पण, त्या जागी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यास किल्ल्याच्या दोन्ही तटांस असणारी तटबंदी कोरीव मृर्तींच्या शिळा, तटबंदीतील शिल्पे इ. अनेक इतिहासाची साक्ष देणारे अवशेष दिसून येतात. त्याचप्रमाणे किल्ल्याजवळ मोठा तलावही आहे. या तलावाच्या काठावर कोरीव शिळांचे अवशेष पाहावयास मिळतात. पण, हा किल्ला आज मानवी अतिक्रमणाच्या विळख्यात असून या किल्ल्याच्या अवशेषावर पाण्याची टाकीही बांधली असल्याचे दिसते.
वसई मोहिमेचा सुवर्णकाळ जपणारा किल्ला मांडवी आज शौचालय बनला आहे. तो केविलवाण्या अवस्थेतच संवर्धनाची वाट पाहत आहे. तर, पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याची नोंद संरक्षित स्मारकात आहे की
असंरक्षित स्मारकात आहे, हेही एक कोडेच आहे.
मानवी अतिक्रमण वाढल्याने दुर्गांचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. वसई प्रांताचा प्रामाणिक इतिहास सांगणारा मांडवी कोट आज नामशेष होण्याच्या मार्गावर असून वसईतील दुर्गप्रेमींनी एकदा तरी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी अभ्याससफर करावी, असे श्रीदत्त राऊत यांनी दुर्गप्रेमींना आवाहन केले
आहे.