काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीला तारीख पे तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:06 AM2017-07-20T04:06:43+5:302017-07-20T04:06:43+5:30

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील पीओपी छत कोसळण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप हे नाट्यगृह सुरू न झाल्याने ठाण्यातील कलाकारांनी

Date of date of repairs of Kashinath Ghanekar Natyagrah | काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीला तारीख पे तारीख

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीला तारीख पे तारीख

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील पीओपी छत कोसळण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप हे नाट्यगृह सुरू न झाल्याने ठाण्यातील कलाकारांनी याबाबत आपला रोष व्यक्त केला आहे. नाट्यगृह आज सुरू होईल, उद्या होईल असे सांगत प्रशासन तारीख पे तारीख देत आहे. मात्र प्रत्यक्षात नाट्यगृह कधी सुरू होईल याबाबत काहीही सांगितले जात नाही, अशा शब्दांत कलाकारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
ठाण्यात मध्यवर्ती भागात गडकरी रंगायतन आणि घोडबंदर परिसरात घाणेकर ही दोन नाट्यगृहे आहेत. त्यातील एक बंद अवस्थेत असल्याने सर्व भार हा गडकरी रंगायतनवर येत असल्याचे कलाकारांनी सांगितले. नाट्यगृह पुन्हा सुरू करायला प्रशासन किती विलंब लावणार, असा सवाल ठाण्यातील कलाकारांनी केला. नाट्यगृहाच्या मूलभूत बांधकामातच गोंधळ असून येत्या दहा वर्षांत नाट्यगृहाचे खंडहर होईल की काय अशी भीती कलाकारांकडून व्यक्त होत आहे. नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये पावसाळ््यात पाणी येते, पाणी भरल्याने कार्पेट ओले होऊन कुबट वास पसरतो. मिनी थिएटरचा दरवाजा उघड-बंद करताना मोठा आवाज येतो.
त्यामुळे प्रेक्षक आणि रंगमंचावरील कलाकाराचा रसभंग होतो. तालीम हॉलमध्ये डान्सची तालीम सुरू असेल तर तो आवाज भर प्रयोगात रंगमंचापर्यंत ऐकू येतो. मिनी थिएटरमधील कार्यक्रमाचा आवाज मुख्य थिएटरमध्ये आणि मुख्य थिएटरचा आवाज मिनी थिएटरमध्ये येतो. अशा अनेक समस्या या नाट्यगृहात आहे. परंतु याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे.

घाणेकर नाट्यगृहातील प्रयोगांसाठी जितके तिकीटांचे दर आकारले जातात तितक्या सुविधा दिल्या जातात की नाही याचा आढावा प्रशासनाने घ्यावा. तालीम हॉलमध्ये सुरू असलेल्या तालमीचा आवाज मिनी थिएटरमध्ये सुरू असलेल्या प्रयोगादरम्यान येतो हे अत्यंत खेदजनक आहे. नुसती रंगरंगोटी करुन काही होणार नाही. पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था या नाट्यगृहात नाही. शौचालयाची अवस्था भयावह आहे. आज छत कोसळण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत नवीन थिएटर बांधून तयार झाले असते. नाट्यगृहाचे बांधकाम पाहता १० वर्षांच्या आतच या नाट्यगृहाची भीषण अवस्था होईल.
- विजू माने, सिने दिग्दर्शक

मिनी थिएटरमध्ये कदाचित डकमधून पाणी येत असावे. तिथल्या कामाचे डिझाईन मागावले आहे लवकरच ती दुरूस्ती केली जाईल. ३१ जुलैच्या आत नाट्यगृह खुले होईल.
- दत्तात्रय मोहिते,
उपनगर अभियंता, ठामपा

आपल्याकडे दोनच नाट्यगृह आहेत. एक बंद असल्याने दुसऱ्या नाट्यगृहावर भार येत आहे. मिनी थिएटरमध्ये पाणी गळती सुरू असते. साऊण्डचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हे नाट्यगृह लवकर सुरू न झाल्यास त्याचा कबुतरखाना व्हायला वेळ लागणार नाही. नाट्यगृह सुरू होण्याच्या आधी तीन तारखा ऐकल्या होत्या. आता १५ आॅगस्टला सुरू होईल असे ऐकले आहे.
- मंगेश देसाई, अभिनेते

नाट्यगृहाच्या मूळ बांधकामातच गोंधळ आहे. त्याची देखभाल नीट होत नाही. मिनी थिएटरचे दरवाजे धडाधड वाजतात. त्यांचा स्टॉपर अजून बदललेला नाही. नाट्यगृह लवकर सुरू करण्याबद्दल संबंधितांना वारंवार सांगितले. मुळात थिएटर इतके महिने बंद राहण्याचे कारण काय? ते प्रशासनाने स्पष्ट करावे. एकीकडे ठाण्यात कलेचे वातावरण आहे. नाट्यप्रयोग होतात, मोठ्या संख्येने कलाकार राहतात, ही दोन्ही नाट्यगृह आकर्षणाचे बिंदू असताना दुसरीकडे नाट्यगृहांची ही अवस्था आहे. मिनी थिएटरच्या गॅलरीमधून पावसाच्या झडी मारुन पाणी आत येत असते. आता आम्हा कलाकारांनाच नाट्यगृह सुरू होण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. इतके मोठे नाट्यगृह उभारण्यात आले पण त्याची देखभाल होणे आणि बांधल्यानंतर काही त्रुटी राहील्यास त्या दूर करणे गरजेचे आहे.
- उदय सबनीस, अभिनेते

हे नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावे असे एक कलाकार म्हणून वाटते. पण त्याचे बांधकाम तितक्याच चांगल्या पद्धतीने देखील व्हावे.
- संपदा जोगळेकर, अभिनेत्री

Web Title: Date of date of repairs of Kashinath Ghanekar Natyagrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.