भंडार्ली डम्पिंग बंदसाठी महापालिकेकडून पुन्हा 'तारीख पे तारीख'; आता २५ ऑक्टोबरची डेडलाईन
By अजित मांडके | Published: October 2, 2023 04:55 PM2023-10-02T16:55:49+5:302023-10-02T16:56:33+5:30
ग्रामस्थांना दिले लेखी आश्वासन, मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी घेतली आयुक्तांची भेट
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भंडार्ली येथील डम्पींग बंद संदर्भातील आश्वासन पालिकेने न पाळल्याने रविवारी येथील ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या अडविल्या होत्या. त्यानंतर सोमवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत आता २५ ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली असून त्यानंतर एकही गाडी भंडार्लीला जाणार नसल्याचे लेखी आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे. परंतु त्यानंतरही डम्पींग बंद झाले नाही तर मात्र एकही गाडी जाऊ देणार नसल्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कचरा भंडार्ली येथे गेल्या वर्षभरापासून टाकण्यात येत आहे. त्याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असे सांगण्यात आले होते. मात्र तसे न होता, येथे कचरा केवळ डम्प केला गेला आहे. ११ महिन्यासाठी भाडे तत्वावर ठाणे महापालिकेचा कचरा भंडार्ली डम्पिंगला टाकला जाईल असे सांगितले होते. त्याला लोकप्रतिनिधींसह १४ गावातील नागरिकांनी इच्छा नसताना होकार दर्शविला. त्यावेळी ११ महिन्यांचा करार संपल्यावर त्वरित भंडार्ली डम्पिंग बंद केला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये ते बंद होणे अपेक्षित होते. त्यानंतर भंडार्ली डम्पिंग बंद होणे गरजेचे होते पण ते चालूच राहिले. स्थानिक आमदार प्रमोद पाटील यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली असता १४ जुलै २०२३ रोजी डम्पिंगवर पाहणी करण्यासाठी आले होते व दुसºया दिवशी १५ जुलै २०२३ रोजी आमदार राजू पाटील व ग्रामस्थ यांची ठाणे महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून दोन महिन्याचा वेळ वाढून घेतला त्याला ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी भंडार्ली डम्पिंग बंद केले जाईल असे महापालिकेने सांगितले होते. त्यानंतर ३० सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही ते बंद न झाल्याने १ ऑक्टोबर रोजी स्थानिकांसह पाटील यांनी याठिकाणी महापालिकेच्या कचºयाच्या गाड्या अडविल्या होत्या.
दरम्यान हे आंदोलन होताच, ठाणे महापालिका आयुक्तांनी आमदारांना फोन करुन बैठकीसाठी पाचारण केले होते. त्यानुसार सोमवारी आयुक्त बांगर यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी आयुक्तांनी यातील अडचणी त्यांच्या समोर मांडल्या. त्यावर मात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार येत्या २५ ऑक्टोबर नंतर एकही गाडी भंडार्लीला जाणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले असल्याचे माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली. पंरतु त्यानंतर देखील डम्पींग बंद झाले नाही तर मात्र एकही गाडी जाऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
स्थानिकांचा विरोध झाला तर आमचाही विरोध
भंडार्ली डम्पींग बंद होत असतांना दुसरीकडे डायघर येथील कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात पाटील यांना छेडले असता, महापालिकेने या प्रकल्पा बाबत स्थानिकांच्या शंकाचे निरासन केले तर काही अडचण राहणार नाही. मात्र स्थानिकांचे समाधान झाले नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही त्यांच्या बाजूने उभे राहावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.